भाजपने गेल्या १७ वर्षांत राहुल गांधीची बेसुमार बदनामी केली, टर उडवली. नेहरु – गांधींच्या घराणेशाहीला विरोध करताना राहुल गांधींचे अक्षरशः खच्चीकरण केले गेले. शहजादा, पप्पू, युवराज इतकेच नाही तर एक बावळट, खुशालचेंडू, गुलछबू अशी प्रतिमा सामान्यजनतेत रुजविण्यात भाजपला खूप मोठे यश आले. सोशल मीडियातून जोरदार मोहिम राबवून, ही व्यक्ती कशी राष्ट्र सांभाळण्याच्या लायकिची नाही, असे एक `नॅरेशन` पध्दतशीर सेट केले. दुर्दैव असे की, २०१४ आणि नंतर २०१९ च्या निवडणूक निकलांतूनही त्यावर शिक्कामोर्तब झाले. विश्वासार्हता गमावलेल्या माध्यमांनीही नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी अशी तुलना करताना बदनामीचीच री ओढली. देश स्वातंत्र झाल्यानंतर आजवर एकाही पुढाऱ्याची झाली नसेल इतकी नाचक्की केली. परिणामी आजही देशात काँग्रेसची जी काही घसरगुंडी सुरू झाली ती थांबायचे नाव घेत नाही. गल्ली ते दिल्ली मोदी मोदी आणि मोदीच आहे. मोदींसमोर विरोधकांकडे दुसरा पर्यायच नाही आणि राहुल गांधी तर नाहिच नाही, असे एक नॅरेशन सेट केले गेले. प्रतिमाभंजन करून एखाद्याचे माणसिक खच्चीकरण करायचे हा भाजपचा तसा जुनाच फंडा, त्याची सर्वात मोठी शिकार म्हणजे राहुल गांधी.
खरेच, आचार विचारात म्हणजेच वागण्या बोलण्यात राहुल गांधी तसे आहेत का, यावर आता तमाम जनताच सखोल विचार करु लागली आहे. पूर्वी जे एकले ते आणि वास्तव याची पडतळ बसत नसल्याने लोक संभ्रमात पडलेत. आता कारणही तसेच आहे. कन्याकुमारी ते कश्मिर अशी तब्बल ३,५०० किलोमीटरची १५० दिवस चालणारी आणि १२ राज्यांतून जाणारी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा. खरे तर, ही राष्ट्रीय बातमी, पण इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा पूरता गोदी मीडिया झाल्याने राहुल गांधी यांचे पराक्रम, अभियान आणि त्याला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद दाखवायलासुध्दा माध्यमे घाबरली. कोंबडे झाकल्याने सुर्य उगवायचा राहत नाही, हे लक्षात असू द्या. ज्या सोशल मीडियाचे हत्यार करून मोदी दोन वेळा पंतप्रधान झाले त्याच सोशल मीडियावर जनतेनेच ही भारत जोडो यात्रा उचलून धरली.
यात्रा सुरू झाल्यापासून दक्षिणेतील केरळ, तमिळनाडू, आंध्रा, कर्नाटक या राज्यांतून लाखोंचा जनसमुदाय राहुल गांधी यांच्याबरोबर चालतोय. लाखोंच्या सभा होत आहेत. आता ही यात्रा महाराष्ट्रा असून लवकरच ती मध्यप्रदेशमध्ये जाणार आहे. तरुण-तरुणींच्या झुंडीच्या झुंडी या यात्रेत सहभागी होताहेत. महिलांचाही सहभाग लक्षणीय आहे. अंध, अपंगांसह भाजप विरोधातील सर्वच राजकिय पक्षांनी राहुल गांधींना नैतिक बळ दिले. काँग्रेसचे हे घरचेच कार्य आहे, पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादीसुध्दा तिरंग्याखाली एकत्र आलेत. राहुल गांधी रोज २५ किलोमोटरचा प्रवास करतात. प्रवासातील गावोगावचे प्रश्न समजून घेत आहेत. कार्यकर्ते आणि सामान्य जनतेशी चर्चा करत करत हा रथ अखंड धावतोच आहे. दीड-दोन महिन्यांत राहुल गांधींची १२०० किलोमीटरवर पदयात्रा पूर्ण झाली, पण कुठेही चेहऱ्यावरची सुरकुती हालली नाही. मोदी- शाहा यांच्या दबावामुळे या यात्रेला माध्यमांनी जेमतेम प्रसिध्दी दिली, पण राहुल गांधींनी त्याचीही पर्वा केली नाही.
आपल्या बदनामीला उत्तर न देता राहुल गांधींचा प्रवास अखंड आहे. २००४ पासून त्यांचा अवमान सुरू आहे, पण विरोधकांच्या आरोपांवर ते खुलासे करत बसले नाहीत. भाजपने त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांचीही राळ उडवली होती. त्यांची गर्लफ्रेड कुठली, ती काय करते, हे कधी भेटतात, त्यांनी आजवर लग्न का केले नाही यावरही काथ्याकूट झाली. चरित्रहननाची हद्द झाली, पण राहुल गांधी बधले नाहीत. होणारे सर्व हल्ले त्यांनी पचवले, परतवून लावले. खोटेपणा कधी केला नाही. जिद्द, चिकाटी, साहस अंगी बाळगले. नोटबंदी कशी खोटी होती ते त्यांनी घसा कोरडा होईस्तोवर सांगितले, नाव कानफाटे पडल्याने कोणी एकत नव्हते. आता तमाम अर्थतज्ञ तेच सांगतात. राहुल गांधी जे जे बोलले ते त्यावेळी कोणी एकले नाही. माध्यमांनीही त्यांची थट्टा केली होती, पण आता तेच सत्य होते हे पावलोपावली दिसते.
राहुल गांधी यांना भारतातील समस्येवर एखादे ट्विट केले, पत्रकार परिषद घेतली, मुलाखत दिली तर मोदींची प्रशासकीय यंत्रणा, पीएमओ कार्यालय, भाजपचा आयटी सेल, सर्व मंत्रिगणांना त्याविरोधात मैदानात उतरावे लागते. राहुल गांधींना खोडत राहणे ही त्यांची अपरिहार्य गरज बनली आहे. सर्व प्रकारच्या प्रचारमाध्यमांतून बदनामी युद्ध छेडलेले असतानाही सातत्याने राहुल गांधी एकाकीपणे या सर्वासमोर उभे राहिले. कित्येक वर्षात गांधी परिवारावरील एकही भ्रष्टाचाराचा आरोप विरोधक आजतागायत सिद्ध करू शकले नाहीत. भारत जोडो यात्रा च्या निमित्ताने राहुल गांधी लोकांना जसे भासवले तसे नाहीत. आता लोकांना ते पटले म्हणून लाखो लोक त्यांच्या मागे चालतात. २०२४ मध्ये ते पर्याय होतील ना होतील पण काय खरे काय खोटे ते लोकांना समजले. राहुल गांधी बदललेत, मूळात भाजपने जे बिंबवले तसे ते भोळसट, बावळट, गुलछबू नाहीत याचेही प्रत्यंतर आले. लोकांना दांडी यात्रेची आठवण येते. राहुल गांधी आता पप्पू राहिलेले नाहीत तर, बापू भासू लागलेत.
होय, दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी स्वतःची जी प्रतिमा निर्माण केली त्यातील फोलपणाही उघड होऊ लागला. मोदींनी स्वतःला वेळोवेळी नमो, चायवाला, फकिर, चौकीदार, माँ गंगा का बेटा, यु.पी. का गोद लिया बेटा, स्वयंसेवक, प्रधानसेवक, माँ भारती का लाल, पठाण का बच्चा, पिछडी जात का, आज का सरदार, विकासपुरुष, गरीब माँ का बेटा, ५६ इंच का सीनेवाला, कामदार यासह गुजरात का बब्बर शेर अशा असंख्य विशेषणांनी स्वतःला जनतेसमोर पेश केले. यातील असंख्य विशेषणे त्यांनी स्वतःच स्वतःसाठी प्रथम वापरल्याचे दिसून आले. २०१४ आणि २०१९ मध्ये `नमो` विरुध्द `रागा` हा एकतर्फी सामना पाहिला, पण २०२४ मध्ये तसे नसेल. मूख और मुखवटा यातला फरक स्पष्ट होईल. त्याअर्थाने भारत जोडे महत्वाची वाटते.