आता राहुल गांधी निवडणूक लढवू शकतील का ?

0
278

नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) : मानहानीच्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली आहे. केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधींना लोकसभेसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. पुढची आठ वर्षे ते निवडणूक लढवू शकत नसल्याचे कायदा सांगतो

राहुल गांधींसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. राहुल गांधींना लोकसभेतून यासंदर्भात जारी करण्यात आलेली अधिसूचनाही देण्यात आली आहे. गुरुवारीच न्यायालयाने राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. आता प्रश्न पडतो की राहुल गांधी 2024 मध्ये होणारी लोकसभा निवडणूक लढवू शकणार का?

काय सांगतो कायदा :
– लोकप्रतिनिधी कायद्यात अपात्रतेबाबत तरतूद आहे. लोकप्रतिनिधी अधिनियम कायद्याच्या कलम 8(3) मध्ये असे नमूद केले आहे की कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या व्यक्तीला कमीत कमी दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्याच्या तारखेपासून अपात्र ठरवले जाईल.

– शिवाय, ती व्यक्ती शिक्षा भोगल्यानंतर सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवू शकणार नाही.
– राहुल गांधींना या कायद्यान्वये खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने अपात्रतेची नोटीस बजावली असून, राहुल गांधींची वायनाडची जागा आता रिक्त असल्याचे स्पष्ट केले आहे.
– त्यांच्या सुटकेनंतर 6 वर्षे अपात्रता चालू राहील, याचा अर्थ त्यांना एकूण 8 वर्षांसाठी अपात्र ठरवले जाऊ शकते.