आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे सुध्दा म्हणतात… दादा मुख्यमंत्री होतील

0
270

पुणे, दि. २४ (पीसीबी) – अजित पवार गट 2 जुलैला भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सामील झाला. तेव्हापासूनच अजित पवार आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद याची जोरदार चर्चा होतेय. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. राष्ट्र्वादीचे नेते तर वारंवार अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं बोलून दाखवत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर भाष्य केलंय. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते.

राज्याच्या सरकारमध्ये आम्ही जेव्हा सहभागी झालो, तेव्हाच मुख्यमंत्रिपदावरून स्पष्टता झाली आहे. तशी चर्चा झालेली आहे. आता आम्ही एनडीएचा घटक आहोत. मुख्यमंत्रिपद अजितदादांना मिळावं, अशी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा आहे. मात्र आता महायुती आम्ही उभी केली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपदाचाचा विषयच नाही. आगामी काळात एनडीए बरोबर काम करण्याचा मानस आम्ही तयार केला आहे, असं सुनिल तटकरे म्हणाले.

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं म्हटलं आहे. अजितदादा पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, अशी आमच्यापासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सगळ्यांचीच इच्छा आहे. अजितदादा कधीना कधी मुख्यमंत्री होती, हा आत्मविश्वास आहे. अजित दादा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर 145 चा आकडा गाठावा लागतो. ते झालं तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं अनिल पाटील म्हणाले.

पुण्यातील बालेवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सतेज करंडक आणि पुणे लीग कबड्डी स्पर्धा 2023 च्या पारितोषिक वितरणासाठी सुनील तटकरे उपस्थित होते. तिथं त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे.

संजय राऊत, विनायक राऊत यांनी काय म्हणावं आणि त्यावर मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही. टीका टिप्पणीपासून अलिप्त राहून राज्याच्या विकासाला आम्ही प्राधान्य देणार आहोत. केसरकर आणि आम्ही एकत्र काम केले आहे. सकारात्मक पद्धतीने काम करणार आहोत, असंही तटकरे म्हणाले.

कोणी ही नाराजी नाही, शिवसेना आमदारांनी कोणी ही नाराजी व्यक्त केलेली नाही. आता नाराजी कोणाची असेल त्याच्याबद्दल मी बोलणे उचित नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांना सगळ्यांना निधी देऊन न्याय दिला आहे, असं म्हणत तटकरे यांनी निधी वाटपावर भाष्य केलं आहे.