दि.५ (पीसीबी) – गेल्या काही वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहन वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. याच अनुषंगाने ३ महत्वाच्या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी पूर्णपणे टोलमाफी लागू करण्यात आली आहे. या निर्णयाचा लाभ हजारो वाहनधारकांना होणार असून प्रवास अधिक स्वस्त होणार आहे.सरकारने मोटार व्हेईकल अॅक्ट 1958 अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. यानुसार M2, M3 आणि M6 श्रेणीतील चारचाकी इलेक्ट्रिक वाहने तसेच राज्य परिवहन महामंडळ आणि खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसना ही टोलमाफी लागू असेल.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, २२ ऑगस्ट २०२५ पासून ही योजना अंमलात आली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनधारकांना प्रवास करताना टोलबाबत एकाही रुपयाचा खर्च करावा लागणार नाही.या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढेल आणि लोकांना त्यांची खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे सरकारचे मत आहे. याचबरोबर वाहन निर्मिती उद्योगांनाही चालना मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरणपूरक वाहनांच्या वापरात वाढ होईल, ज्यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होणार आहे. सर्व स्तरांतून या निर्णयाचे स्वागत केले जात असून, हजारो रुपयांची बचत वाहनधारकांना होणार आहे.इलेक्ट्रिक वाहनांमुळे पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचतो. ही वाहने पर्यावरणपूरक असल्याने वायू व ध्वनी प्रदूषण होत नाही. पारंपरिक वाहनांच्या तुलनेत ही वाहने अधिक किफायतशीर ठरतात. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी हा निर्णय लाभदायक असून पर्यावरण रक्षणालाही तो हातभार लावणार आहे.