आता मुख्यमंत्री शिंदे देणार कल्याणीनगर अपघातस्थळाला भेट

0
185

पुणे, दि. २९ (पीसीबी) – हिट एन्ड रन प्रकरण देशभरात गाजत असल्याने प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष घातले आणि प्रशासन हालले, आता खुद्द मुख्यमंत्री शिंदे हे सरसारवले आहेत. देशभरात गाजत असलेल्या कल्याणी नगर अपघात प्रकरणात पोलिसानी केलेला तपास आणि प्रगती जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये पोलीस आयुक्तालयात भेट देणार आहेत. तसेच पोलीस आयुक्तांना भेटून यासंबंधी सविस्तर माहिती घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे कल्याणी नगरमधील अपघात स्थळाला देखील भेट देण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसातच शिंदे हे पुण्यामध्ये अपघात स्थळाला भेट देणार असल्याची माहिती आहे.

रविवार दिनांक १९ मे रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास १७ वर्षी अल्पवयीन मुलाने पोर्शे कार बेदरकार आणि मद्यधुंद अवस्थेत चालवून एका मोटरसायकलला धडक दिली होती. या अपघातात २७ वर्षीय अनिश अवधीया आणि २४ वर्षीय अश्विनी कोष्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर जनक्षोभ उसळला होता. या प्रकरणात येरवडा पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलासह त्याचे वडील या सोबतच त्याला बारमध्ये मद्य पुरवणारे हॉटेल चालक, व्यवस्थापक यांच्यासह त्याच्या आजोबांवर गुन्हा दाखल करून त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे.

या प्रकरणामध्ये चालक बदलण्याचा देखील प्रयत्न झाला तसेच ससून रुग्णालयामध्ये आरोपी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून त्या ठिकाणी भलत्याच व्यक्तीचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे देखील समोर आले आहे. या अल्पवयीन मुलाच्या बांधकाम व्यावसायिक वडिलांनी आणखीन कोणा कोणाला कुठे कुठे ‘मॅनेज’ करण्याचा प्रयत्न केला याची सर्व माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांकडून पोलीस आयुक्तालय, राज्य उत्पादन शुल्क, आरटीओ, ससून आदी ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन यासंबंधीची माहिती घेऊन पोलिसांसोबत पत्रकार परिषद घेतली होती.

त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील याप्रकरणी आपण उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे आणि पोलीस आयुक्तांना कठोर कारवाई करायची निर्देश दिले असे स्पष्ट केले होते. मात्र, अजित पवार यांच्यावर देखील अंजली दमानिया यांनी आरोप सुरू केलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः आता पुण्यामध्ये येऊन या सर्व प्रकरणाचा आढावा घेणार आहेत.