दि.१३(पीसीबी)- रिक्षाचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून सुरू असलेला वाद आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई गँगच्या कथित हस्तक्षेपामुळे खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर येथील आरटीओ विभागातील मराठी अधिकारी नलावडे यांना धमकीचा फोन आल्याची घटना समोर आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेची माहिती देत, रिक्षाचालकांना मराठी बोलणे सक्तीचे करण्याच्या निर्णयामुळेच ही धमकी दिल्याचा संशय व्यक्त केला आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत परिवहन विभागाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे ‘मराठी विरुद्ध अमराठी’ असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंदी भाषिक विभाग प्रमुख मनीष दुबे यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. रिक्षाचालक हे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा असून, त्यांच्यावर अचानक भाषेची सक्ती करणे अन्यायकारक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठी भाषा शिकणे आवश्यक असले तरी त्यासाठी योग्य कालावधी देणे गरजेचे आहे. किमान सहा महिने ते एक वर्षाची मुदत द्यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे भाषिक अस्मिता आणि दुसरीकडे रोजगाराचा प्रश्न—या दोन मुद्द्यांमुळे हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे.
आता सरकार या वादावर काय भूमिका घेते, तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोणती पावले उचलते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.











































