“आता बस्स झालं! छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने…… ”, संभाजीराजेंचा भाजपाला इशारा

0
50

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : “गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभं राहिलं. पण 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जलपूजन झालेल्या अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक अद्याप का उभं राहिलं नाही”, असा रोखठोक सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केला. ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात बोलत होते.

छत्रपती संभाजीराजे यांनी अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची पाहणी दौरा आयोजित केला होता. संभाजीराजे आज हजारो शिवभक्तांसह सकाळी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्यासाठी या, असे आवाहन संभाजीराजेंनी केले होते. यानंतर संभाजीराजे हे मुंबईत दाखल होताच त्यांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली. यावरुन संभाजीराजे आक्रमक झाले. आम्ही फक्त तिथे जाऊन बघून येणार आहोत. आम्ही कायदा हातात घेणार नाही. आम्ही गुंडगिरी करतोय का, आम्हाला अभिवादन करू देत नाहीत. आमचा हेतू प्रामाणिक आहे. मी कायदा मोडत असेल तर इथून परत जातो, असे संभाजीराजेंनी यावेळी म्हटले.

भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात अरबी समुद्रात एक स्मारक उभारु असे सांगितले. २०१६ रोजी म्हणजेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी संधी साधून घाई गडबडीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे जलपूजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा जलपूजन करण्यासाठी येतात, तेव्हा याचा अर्थ काय असतो की तुमच्याकडे सर्व परवानग्या असल्या पाहिजेत. त्याशिवाय कोणताही पंतप्रधान येत नाही. मोदींनी जलपूजन केले, मीही तिथे हजर होतो. मला अभिमान वाटला. गडकोट किल्ल्याचे संवर्धन व्हायलाच हवं. पण अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक व्हायला हवे, ही भूमिका होती. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभं राहिलं. मला तुलना करायची नाही, असे संभाजीराजे म्हणाले.

मी हे राजकीय भाषण करत नाही. माझा जन्म त्या घराण्यात झाला आहे. त्यामुळे मला बोलण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी या परिसरात लावलेले बॅनर हटवले. इतर पक्षांचे बॅनर चालतात. ही हुकूमशाही कसली आहे, ही दडपशाही कसली आहे. मी बोट चालकांना सुरक्षेच्या दृष्टीने जिथे जाण्यास परवानगी नाही, तिथे जायच नाही, हे आधीच सांगितलेले आहे. आम्ही दुर्बिणीने स्मारकाचे काम पाहू. तिथून अभिवादन करु, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही फक्त तिथे जाऊन बघून येणार आहोत. आम्ही कायदा हातात घेणार नाही. आम्ही गुंडगिरी करतोय का, आम्हाला अभिवादन करू देत नाहीत. आमचा हेतू प्रामाणिक आहे. मी कायदा मोडत असेल तर इथून परत जातो. अजिबात पुढे जाणार नाही. गडकोट किल्ल्यांसाठी आम्ही भूमिका घेतली. कारण मी कधीच मतांसाठी बोलत नाही. माझ्या प्रामाणिकपणावर अजिबात शंका घ्यायची नाही. देशातील १३ कोटी जनतेला हे दाखवायचं आहे की जलपूजन या ठिकाणी झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आता खोटं चालणार नाही. भरपूर झालं आता. खूप राजकारण झालं, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला.

“तुम्हाला जर स्मारक बनवायला जमणार नसेल तर तसं स्पष्ट सांगा. आम्हाला स्मारक जमणार नाही, आम्ही ते पैसे गडकोट किल्ल्यांसाठी देतो. ते तरी जाहीर करा. ४५० कोटी गडकोट किल्ल्यांच्या संवर्धन, जतन आणि तुमच्या इतर उत्सवासाठी देतो. आतापर्यंत यातले किती पैसे दिले? महाराष्ट्रात जितके जिल्हे आहेत, त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी ३ टक्के पैसे हे किल्ल्यांच्या संवर्धनासाठी दिले जातील. आतापर्यंत यातले किती पैसे गेले? माझ्या कार्यकर्त्यांना मुद्दाम आत टाकले जात आहे ही हुकूमशाही आहे”, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.