आता पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांची लवकरच बदली

0
310

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : सत्तांतर होताच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी पालकमंत्र्यांचे प्रयत्न होत असतात. एकनाथ शिंदे सरकार आल्यानंतर बदल्यांचा धमाका सुरू झाला आहे. काही महिन्यापूर्वीच नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी विराजमान झालेले रमेश पवार यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर डॉ. चंद्रकांत पुलकुंडावर यांची मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त तसेच पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदल्यांची प्रतिक्षार्च आहे.

मार्च 2022 मध्ये रमेश पवार यांची नाशिकचे महापालिका आयुक्त म्हणून नियूक्ती करण्यात आली होती. परंतु, अवघ्या चारच महिन्यात त्यांची बदली करण्यात आली. पवार यांच्या जागी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अवघ्या चार महिन्यांतच पवार यांची बदली झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. रमेश पवार हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काही काळ ते मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी होते. त्यांनतर ठाकरे यांनी त्यांची नाशिकला बदली केली होती. मात्र चार महिन्यांतच पवार यांची बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवाय शिंदे सरकारने हा निर्णय घेतल्याने ठाकरेंना दणका दिल्याचे बोलले जात आहे.

महाआघाडी सरकार असताना उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मनासारखे काम कऱणाऱ्या अधिकाऱ्यांची महत्वाच्या ठिकाणी वर्णी लावली होती. आता पवार यांची सद्दी संपली असून मंत्रीमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेता त्यापूर्वीच महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्याधिकारी, पोलिस आयुक्त, पीएमआऱडीए मुख्याधिकारी यांची बदली अपेक्षित आहे. भाजपाच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तगादा लावला आहे.
सातारा आणि सांगलीला नवे जिल्हाधिकारी

नाशिकसह सातारा आणि सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची देखील बदली करण्यात आली आहे. डॉ. मंताडा राजा दयानिधी यांची सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची देखील बदली झाली आहे. त्यांच्या जागी रुचेश जयवंशी यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.