आता पाचवी आणि आठवीसाठी होणार वार्षिक परीक्षा, त्यानंतरच…

0
321

महाराष्ट्र, दि. २५ जून (पीसीबी) – शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार आता, इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. आतापर्यंत आठवीच्या विद्यार्थ्यांना नापास करता येत नव्हते आणि विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्यात येत होते. मात्र, आता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, 2011 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यात नव्या नियमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार, इयत्ता 5वी च्या वर्गापर्यंत बालकाला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. इयत्ता 6वी आणि 8वीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना बालकाला इयत्ता 5वीच्या वर्गासाठीची विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील.

या वार्षिक परीक्षेत विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्याला इयत्ता 5वीच्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी इयत्ता 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद इयत्ता 5वी आणि 8वीच्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल.

जर विद्यार्थी वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही तर अशा विद्यार्थ्याला संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल. वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.

जर विद्यार्थी पुनर्परीक्षेत नापास झाला तर त्याला असेल त्या वर्गात म्हणजेच पाचवी किंवा आठवीच्या वर्गात जसे असेल तसे ठेवले जाईल. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही. विद्यार्थ्यांना थेट नववीच्या वर्गात प्रवेश देण्यात येत असल्याने जेव्हा वार्षिक परीक्षा होत असे तेव्हा काही विद्यार्थी त्यात नापास होत असे. त्यामुळे आता विद्यार्थी अभ्यासात कमी पडू नयेत यासाठी शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.