विदेश, दि. ०२ जुलै (पीसीबी) – अमेरिकेतील अलेफ एअरोनॉटिक्स कंपनीने तयार केलेल्या या उडणाऱ्या कारला तिथल्या सरकारने मंजूरी दिली आहे. या कारचं नाव ‘मॉडेल ए’ असं ठेवण्यात आलं आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) या गाडीला ‘स्पेशल एअरवर्थीनेस’ सर्टिफिकेशन दिलं आहे. अशा प्रकारच्या वाहनाला मंजूरी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक मानला जातोय.
अलेफ एअरोनॉटिक्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या गाडीच्या टेकऑफ आणि लँडिंग नियमांसाठी, तसेच eVTOL आणि ग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील परस्पर संवाद नियंत्रित करण्यासाठी असलेल्या नियमांवर सरकार काम करत आहे. केवळ ठराविक कारणास्तव आणि ठराविक ठिकाणीच या गाड्यांना उडण्याची परवानगी देण्यात आली आहे, असंही कंपनीने स्पष्ट केलं.
ही गाडी तुम्ही रस्त्यावर आणि हवेत अशा दोन्ही ठिकाणी चालवू शकाल. त्यामुळे मोकळ्या रस्त्यावर तुम्ही ही कार पळवू शकता, आणि ट्रॅफिकमध्ये सर्वांच्या वरून निघून जाण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता. ही गाडी इलेक्ट्रिक आहे, आणि याची रेंज सुमारे ३२२ किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच या कारची फ्लाईंग रेंज ही सुमारे १७७ किलोमीटर असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

फॉक्स न्यूज या अमेरिकेतील वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारची (Alef Model A) अंदाजे किंमत ही ३,००,००० डॉलर्स एवढी असू शकते. या कारमध्ये एक किंवा दोन व्यक्ती प्रवास करू शकतात. अलेफ एअरोनॉटिक्स ही कंपनी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात आहे. ऑटोमोटिव्ह आणि एव्हिएशन क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार २०२५ च्या शेवटीपर्यंत ही उडणारी कार डिलिव्हर करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात प्री-ऑर्डर झाल्याचंही कंपनीचे सीईओ जिम ड्युखोव्हनी यांनी स्पष्ट केलं आहे.
ही गाडी नियमित वापरासाठी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे, नेहमीच्या रस्त्यांवरुन तुम्ही तिला वापरू शकाल. तसेच तुम्ही तुमची गाडी आता जिथे पार्क करता, तिथेच ही कारही पार्क करू शकाल. किंवा मग तुमच्या आताच्या गॅरेजमध्ये ही कार ठेऊ शकाल. यासाठी तुम्हाला विशेष काहीही करायची गरज नाही, असं कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
