आता दादांच्या हातातून पिंपरी चिंचवडसुध्दा जाणार ?

0
581
  • थर्ड आय – अविनाश चिलेकर –

अजितदादा बोले आणि पुणे जिल्हा डोले, असा एक काळ होता. बारामती हा तसा दादांचाच बालेकिल्ला होता. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकित सगळे पितळ उघडे पडले. शरद पवार हेच बारामतीकराचे खरे मालक, पालक आहेत. दादा केवळ नामधारी होते, ते फक्त किल्लेदार होते. बारामतीकरांनी थेट मतदानातून तसे निक्षून सांगितले. दादांची सद्दी तिथे संपली. बारामतीला आता विधानसभेला दादाच्या विरोधात युगेंद्र पवार या नातवाला साहेबांनी पुढे काढले. त्यासाठी सलग तीन दिवस बारामती तालुक्याचा गाव खेड्यातून दौरा केला. लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. दादांचे वर्चस्व असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्यात जातीने लक्ष घालणार असल्याचे सांगून कारखान्याच्या आगामी निवडणुकित काय होणार याची झलक दिली. साहेबांचा नाद केल्याचा परिणाम. आता दादांना बारामतीतून एकदम हद्दपार करायचाच चंग काकांनी बांधलाय.

दादांकडे पुणे जिल्ह्यातील संस्था, संघटना, जिल्हा बँक, दूध संघ, साखर कारखाने तसेच आमदार, खासदार अशा सर्वांची पालकत्व होते. लोकसभेला सगळे चित्रच पालटले. बारामती आणि शिरूर असे दोन्ही खासदार म्हणजे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे मोठ्या मताधिक्याने जिंकले. पुणे शहरातसुध्दा साहेबांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचा दबदबा वाढला. आता पवार साहेबांनी एक एक विधानसभा मतदारसंघाचा अभ्यास करून दादांचे ताकदिचे उमेदवार गळाला लावायला सुरवात केली. खोट्या राष्ट्रवादी काँग्रेसची जीरवायचीच असे ठरवून `मिशन अजित`हातात घेतले. जिथे कुठे अजितदादांचे वर्चस्व आहे किंवा होते ते गट, गण, विधानसभा मतदारसंघ टार्गेट करायचे ठरवले. महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० जागा महाआघाडीने जिंकल्याने ठाकरे आणि पवार यांचा आत्मविश्वास दुनावला. अखंड राष्ट्रवादीचे इनमिन ४ खासदार असतं, मात्र पक्ष दुभंगल्यानंतर खासदारांची संख्या चारची आठ म्हणजे दुप्पट झाली. १० जागा लढवल्या आणि आठ जिंकल्या. जे लोकसभेला निकाल ले तसेच विधानसभेलाही अपेक्षित असल्याचे स्वतः शरद पवार यांनी म्हटले आहे. दादांच्या राष्ट्रवादीने ४ जागा लढवल्या आणि कशीबशी एक जिंकली. याचाच दुसरा अर्थ साहेबांच्याच राष्ट्रवादीची ताकद वाढली आणि दादांची घटली असाही होतो. लोकसभेचाच निकाल पुढे विधानसभेलाही कायम असेल, असे छातीठोकपणे साहेब सांगतात. विधानसभेच्या २८८ पैकी प्रत्येकी ९६ जागा लढवायचे महाआघाडीने ठरवले. खरोखर हे तीनही पक्ष वज्रमूठ करून लढले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाचा स्ट्राईक रेट तोच राहिला तर कमीत कमी ७०-७२ जागा मिळू शकतात. मला सत्ता बदलायचीय, असे लक्ष्य ठेवून ८४ वर्षांचे आजोबा महाराष्ट्र पिंजून काढतात तेव्हा

भल्याभल्यांची पळता भुई थोडी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ सभा घेऊनही १८ जागा भाजपला जिंकता आल्या नाहीत. फडणवीसांना विदर्भातील किल्ल्याचे बुरूंज सांभळता आले नाहीत. अजितदादांना भाजप बरोबर घेऊन पायावर धोंडा मारून घेतल्याचे खुद्द रा.स्व.संघाने म्हटले. इतके आघात दादांवर झाल्याने त्यांच्या राष्ट्रवादीची अवस्था मेल्याहून मेल्यासारखी झालीय. आता त्यांचे नेते, सरदार, किल्लेदार आणि कार्यकर्त्ये यांची स्वतःचा बचाव करण्यासाठी धडपड सुरू आहे. १५-२० आमदार साहेबांच्या थेट संपर्कात आहेत. सुरवातीला त्यांना कोणाला प्रवेश नाही असे ठणकावून सांगणारे साहेब आता निवडक लोकांना प्रवेश द्यायची भाषा करत आहेत. थोडक्यात दादांचे गलबत आता भरकटत चाललेय, त्याला गळती लागली आहे. बुडत्याचा पाय खोलात अशी गत झालीय. राजकारणात शत्रुला चकवा द्यायचा, शिकार टप्प्यात आली की बार टाकायचा आणि घायाळ झाला की अंतिम प्रहार करायचा हे तंत्र आहे. शरद पवार हे अशा राजकारणातले बाप आहेत. दादांची अवस्था अदीच लिंबू टिंबू सारखी झालीय. पुणे जिल्ह्यातून दादांना गाशा गुंडाळायला लावायचा साहेबांचा संकल्प दिसतोय.

पूर्वी जुन्या बारामती लोकसभा मतदारसंघात पिंपरी चिंचवड शहर होते म्हणून या महापालिकेची जहागिरी साहेबांनी अजितदादांकडे सोपविली होती. इथे कोण आमदार असावा अथवा महापौर, स्थायी समिती अध्यक्ष इतकेच काय तर प्रभाग अध्यक्ष सुध्दा दादाच ठरवत होते. साहेबांनी एखादे नाव सुचवले तर तेसुध्दा खाली दादा बदलून टाकत. वीस वर्षांत जी काही भूमिपूजने, उद्घाटने झाली त्या प्रत्येक कोनशिलेवर अजितदादा हे नाव कोरलेले आहे. २०१७ मध्ये दादांचे प्रमुख शिलेदार फितूर झाले म्हणून भाजपची सत्ता आली होती. आता दादांच्या राष्ट्रवादीचे किमान २० ते २२ माजी नगरसेवक साहेबांच्या राष्ट्रवादीकडे तोंड करून बसलेत. राजकारणात साहेबांचेच चलणी नाणे खणखणते हे अनेकांनी ताडले. इतकेच नाही तर भाजपमध्ये गेलेले अनेकजण तुतारी वाजवायच्या मूडमध्ये आहेत. विधानसभेला चिंचवड, भोसरी आणि पिंपरी अशा तीनही जागा जिंकायच्याच आणि महायुतीचा शहरातील सुपडा साफ करायचा, अशी व्युहरचना तयार आहे. भाजप आमदारांसह प्रमुख पदाधिकारी तसेच दादांच्या राष्ट्रवादीतील प्रमुख शिलेदारांसह रथीमहारथी पक्षांतर करण्याच्या बेतात आहेत. बारामती खालोखाल पिंपरी चिंचवड शहरातूनही अजितदादांना बस्तान गुंडाळला लावायच्या हालचाली सुरू आहेत. भोसरीत भाजप आमदार महेश लांडगेंच्या विरोधात पक्षातच प्रचंड मोठा असंतोष खदखदतोय. चिंचवड विधानसभेत आमदार अश्विनी जगताप यांच्या विरोधात त्यांचे सख्खे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी उभा दावा मांडलाय. परिणामी जगतापांच्या कुटुंब कलहामुळे भाजपला १०१ टक्का धोका संभवतो. तिकडे पिंपरी राखीव मतदारसंघात दहा वर्षात एकही काम नसलेल्या अजितदादा समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर संपूर्ण पक्ष नाराज असल्याने तिथेही जमीन भूसभुशीत आहे. खुद्द शरद पवार यांनी हे ताडले आणि पेरणी सुरू केली. दादांची पाळेमुळे उखडून टाकायची म्हणून पिंपरी चिंचवडकडे रोहित पवार आणि स्वतः सुप्रिया सुळे लक्ष ठेवून आहेत. अजितदादा हतबल दिसतात, ही पडझड रोखताना ते दिसत नाहीत. दादांच्या वाटेत असंख्य काटे पेरलेले आहेत तसे मोठ मोठे भूसुरूंगही आहेत. फडणवीस-शिंदेंची मदत बारामतीत कुचकामी ठरली. पुणे जिल्हा किंवा पिंपरी चिंचवड शहर दादांच्या हातातून गेलेच तर दादांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. दादा, सावध असा !!!