आता थकीत मालमत्ताकरावर २ टक्क्यांचा विलंब शुल्क लागू !

0
95

– प्रती महिना २ टक्के वाढणारे विलंब शुल्क टाळण्याचे करसंकलन विभागाकडून आवाहन!

पिंपरी, दि. 10 (पीसीबी) : पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आजअखेर ५०८ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला आहे. करसंकलन विभागाने मालमत्ताकरावर पहिल्या तिमाही व दुसऱ्या तिमाहीमध्ये जाहीर केलेल्या विविध सवलतींचा लाभ घेऊन नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे. परंतु अद्यापि कर न भरलेल्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ताकरावर १ ऑक्टोबर पासून २ टक्क्यांचे विलंब शुल्क लागू झाले आहे. सबब, ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही आपल्या कराचा भरणा केलेला नाही अशा नागरिकांनी त्वरीत आपल्या कराचा भरणा करुन थकित रकमेवर वाढणारे विलंब शुल्क टाळावे, असे आवाहन कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्याकडून करण्यात आले आहे.

आत्तापर्यंत ३ लाख ९० हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी भरला कर; निवासी मालमत्ताधारक कर भरण्यामध्ये आघाडीवर
चालू आर्थिक वर्षामध्ये शहरातील ६ लाख ३० हजाराहून अधिक मालमत्ताधारकांपैकी आत्तापर्यंत ३ लाख ९० हजार ५७७ मालमत्ताधारकांनी ५०८ कोटींचा कर भरुन ३० कोटी इतक्या रक्कमेच्या सवलतीचा लाभ घेतला आहे. शहरातील एकूण कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांमध्ये ३ लाख ४२ हजार १५२ निवासी मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. त्यासोबतच, ३२ हजार ३४४ बिगरनिवासी, ८ हजार ७११ मिश्र, २ हजार ९३७ औद्योगिक, २ हजार ६७० मोकळया जमीन अशा मालमत्तांचा समावेश आहे.

नागरिकांनी वेळेवर कर भरुन शहराच्या विकासात हातभार लावा!
पिंपरी – चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांनी सप्टेंबर अखेर आपल्या कराचा भरणा करुन विविध सवलतींचा लाभ घेतला आहे. महापालिकेच्या करसंकलन विभागाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मालमत्ताधारकांनी आपला कर वेळेवर भरला आहे. परंतू ऑक्टोंबरपासून थकीत रकमेवर दरमहिना २ टक्क्यांचे विलंब शुल्क लागू झाले आहे. ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही अशा मालमत्ताधारकांना चालू महिन्यापासून २ टक्क्याचे विलंब शुल्क लागू झाले असून मालमत्ताधारकांनी वाढणारे विलंब शुल्क टाळावे.
– प्रदीप जाभंळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त (१), पिंपरी – चिंचवड महानगरपालिका

नागरिकांनी थकीत कराचा भरणा करुन विलंब शुल्क टाळावे!
शहरातील निम्म्याहून अधिक मालमत्ताधारकांनी महापालिकेने जाहिर केलेल्या सवलत योजनांचा लाभ घेत आपल्या कराचा भरणा केला आहे. परंतू काही मालमत्ताधारकांनी सहा महिने पूर्ण झाले तरी कराचा भरणा केलेला नाही. तरी, ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही मालमत्ताकराचा भरणा केला नाही अशा थकीत रकमेवर चालू महिन्यापासून महिना २ टक्क्यांचे विलंब शुल्क लागू झाले आहे. तरी शहरातील सर्व मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्तेच्या कराचा भरणा त्वरित करुन वाढणारे विलंब शुल्क टाळावे.
– अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका