आता डेल कंपनीत ६,००० कर्मचाऱ्यांची कपात

0
221

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : आर्थिक मंदीच्या सावटाखाली जगभरात अनेक दिग्गज कंपन्यांकडून नोकरकपात सुरु आहे. अॅमेझॉन, गुगल, विप्रो, टीसीएस सह अनेक बड्या कंपन्यांनी रातोरात हजारो कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे. त्यातच आता आणखी एक टेक कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहे. दिग्गज टेक कंपनी डेल आता 6000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, डेल कंपनीकडून अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात येणार आहे. कंपनी जगभरातील हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डेल टेक्नोलॉजी कंपनी जगभरातील 5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा अंदाज मीडिया रिपोर्टनुसार, व्यक्त करण्यात आला आहे.

डेल कंपनीकडून नोकरकपात
संगणक निर्माती कंपनी डेल टेक्नोलॉजीज (Dell Technologies) या वर्षी म्हणजे 2023 मध्ये कर्मचारी कपात करणारी पहिली टेक कंपनी आहे. 2022 मध्ये अनेक मोठ-मोठ्या टेक कंपन्या तसेच इतर क्षेत्रातील कंपन्यांनानीही नोकरकपात केली होती. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, को-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी सांगितले की, कंपनी बाजारातील परिस्थितीवर अवलंबून आहे. भविष्यात कंपनी आणखी कर्मचारी कमी करू शकते.

6000 हून अधिक जणांचा रोजगार धोक्यात
डेल टेक्नोलॉजीज (Dell Technologies) ने आपल्या 6000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डेल आपल्या जागतिक कर्मचार्‍यांपैकी पाच टक्के कमी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे येत्या काळात संगणक निर्मात्या डेल कंपनीतील सुमारे 6650 कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.

हजारो कर्मचाऱ्यांना देणार नारळ
डेल कंपनीचे सह-चीफ ऑपरेटिंग ऑफिसर जेफ क्लार्क यांनी एका निवेदनामध्ये लिहिले आहे की, कंपनी फार कठीण आर्थिक परिस्थितीतून जात आहे. कंपनीला बाजारात मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सध्याची परिस्थिती पाहता येत्या काळातील कंपनीला आपलं भविष्य अनिश्चित दिसत आहे. त्यामुळे यातील समतोल राखण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. IDC च्या मते, जर आपण मोठ्या कंपन्यांबद्दल बोललो तर, 2022 च्या चौथ्या तिमाहीत डेलच्या शिपमेंटमध्ये सर्वाधिक 37 टक्के घट झाली आहे.