मुंबई, दि. ९ (पीसीबी) : सध्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतांच्या जुळवाजुळवीसाठी राजकीय पक्षांमध्ये प्रचंड चुरस दिसत आहे. ही निवडणूक आटोपल्यानंतर अवघ्या १० दिवसांत विधानपरिषदेची निवडणूक आहे. भाजपने काल पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपकडून विधान परिषदेसाठी सहावा उमेदवार म्हणून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्या नावाची चर्चा होती. आता
सदाभाऊ खोत यांना संधी मिळण्याची शक्यता बळावली आहे. रयतक्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांना भाजपकडून बोलावण्यात आलं आहे.
सदाभाऊ खोत हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खोत मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ते अर्ज भरणार आहेत. आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
भाजपने काल विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. यात प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर माजी मंत्री राम शिंदे यांचे विधानसभेतील पराभवानंतर विधानपरिषदेवर पुनर्वसन करण्यात आले आहे.
याशिवाय श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणुक कार्यालयाकडून बुधवारी महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
भाजपकडे हक्काची ११३ मते आहेत. त्यामुळे २७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीला समर्थन असलेल्या २२ मतांची बेगमी करावी लागणार आहे. तर काँग्रेसची ४४ मते असून २७ मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या उमेदवाराला १० मतांची भासणार आहे.