दि . ११ ( पीसीबी ) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या दोन्ही महापालिका ताब्यात घ्यायचा निश्चय केला आहे. गेल्या महिनाभर पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची गल्लीन गल्ली ते पिंजून काढत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील जनसंवाद सभेला अलोट गर्दी झाली आणि त्यांच्या दोन दिवसांच्या कार्यकर्ता गाठीभेटीने भाजपची पळापळ सुरू झाली. यापूर्वी २०१७ मध्ये पराभव झाल्याने दोन्ही शहरातून राष्ट्रवादीची सत्ता आली पाहिजेच असा निग्रह दादांनी केला असून त्यांसाठी जोरदार तयारी आरंभली आहे. पुणे, पिंपरी नंतर आता चिंचवड विधानसभा मतदारसंघात येत्या १५ ऑक्टोंबरला (बुधवार) सकाळी नऊ पासून रहाटणी येथील थोपटे लॉन्स मंगल कार्यालयात जनसंवाद सभा आयोजित केली आहे.
महापालिका, राज्य सरकारशी संबंधीत सर्व विभागांच्या कोणत्याही तक्रारी, सुचना अथवा अन्य काम अडले असेल त्यासाठी थेट अजित पवार यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक करून थेट अजितदादांना कळवता येणार आहे. (https://wa.me/917888566904?text=नमस्कार).
१५ ऑक्टोंबर रोजी चिंचवड येथे होणाऱ्या जनसंवादात अजितदादा स्वतः तुमच्या तक्रारी ऐकतील आणि योग्य त्या उपाययोजना करतील. तुमची समस्या थेट अजितदादांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन माजी सत्ताधारी नेते नाना काटे यांनी केले आहे.
जनसंवाद कोठे – बुधवार, दिनांक १५ ऑक्टोंबर २०२५
वेळ:- सकाळी ०९ वाजल्यापासून
स्थळ:- थोपटे लॉन्स (बँक्वेट), रहाटणी, पुणे ४११०१७