रत्नागिरी, दि. १६ (पीसीबी) : बंडखोरी झाल्यामुळे शिवसेनेची मोठी वाताहत झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले असून शिंदे गटाकडे मुख्यमंत्रिपद असल्यामुळे अनेक इच्छुकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदरनंतर आता कोकणात शिवसेनेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेची गळती थांबायचे नाव घेत नसल्याने स्वतः उध्दव ठाकरे सुध्दा हातबल झाल्याचे चित्र आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेतील 23 पैकी 20 नगससेवक शिंदे गटात सामील होण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील 9 नगरसेवकांना शिंदे गटात सामील केले आहे.
आता माजी मंत्री, बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हे २० नगरसेवक लवकरच शिंदे गटात सामील होण्याच्या हालचाली सुरु असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले. प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आता उदय सामंत सुद्धा 20 नगरसेवकांना फोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेतील नगसेवकांचा मोठा गट सामंत यांच्यासोबत असल्याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरु आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उदय सामंत यांची रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर अनेक नगरसेवकांनी त्यांची भेट घेतली. या नगरसेवकांनी आपण आपल्या सोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे १८ विद्यमान नगरसेवक , शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला.