आता कसं जरांगे पाटील म्हणतील तसं…

0
267
  • शहरात पुन्हा उपोषणाला बसणार मराठे

पिंपरी, दि. २२ (पीसीबी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आजच्या पत्रकार परिषदेतील भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी पिंपरी चिंचवड मध्ये देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण केले जाणार आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत. राज्य सरकार जो पर्यंत ठोस निर्णय घेणार नाही, तो पर्यंत हे आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

सतीश काळे, प्रकाश जाधव, मारुती भापकर, सचिन चिखले, लहू लांडगे, वैभव जाधव, जीवन बोराडे, नकुल भोईर, अभिषेक म्हसे, सागर तापकीर, सुनिता शिंदे, मीराताई कदम, स्मिता म्हसकर आदींनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे.

प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम संपलेला आहे. त्यानुसार त्यांनी आंतरवली सराटे येथे पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा स्पष्ट केली आहे. 24 ऑक्टोबर पर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास 25 ऑक्टोबर पासून उपोषण केले जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण करण्यात येणार आहे. सर्कल मधील सर्व गावच्या वतीने एकाच ठिकाणी ताकदीने साखळी उपोषण सुरू केले जाणार आहेत. पुढे 28 ऑक्टोबरपासून त्याच साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात होणार असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, प्रचंड संख्येने समाजाने एकत्रित येऊन कँडल मार्च काढण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी केले.

जरांगे पाटील यांच्या या आवाहनाला पिंपरी-चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पाठिंबा देणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात साखळी उपोषण सुरू केले जाणार आहे. या पुर्वी देखील शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाद्वारे मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा तीव्र करत शासनाचे लक्ष वेधून घेतले होते. एक दिवस शहर बंदची हाक देऊन मराठा समाजाच्या लढ्याला पाठिंबा दिला होता. दरम्यान शासनाने काही दिवसांची मुदत मागितल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते. मात्र आता हे आंदोलन तडीस न्हेऊन राज्य सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. शहरातील सर्व सामाजिक, राजकीय संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा,असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते सतीश काळे यांनी केले आहे.