आता ओबीसींचा शुक्रवारी जालन्यात एल्गार, सरकारचे टेन्शन वाढले

0
256

सिन्नर, दि. १६ (पीसीबी) – ओबीसी व भटके विमुक्त प्रवर्गातील आरक्षण बचावासाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी सिन्नरमधून कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. शुक्रवारी, 17 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी तालुक्यातील माळी, वंजारी, धनगर यासह अठरापगड जातीतील समाजबांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने देण्यात आली. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी व भटक्या जमाती असा संघर्ष राज्यात उभा राहिला आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे अशी ओबीसी प्रवर्गातील समाज घटकांची मागणी आहे. दरम्यान, मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्याच्या मागणीसाठी एकिकडे मनोज जरांगे हे महाराष्ट्राचा दौरा करत असतानाच दुसऱ्या बाजुला ओबीसी समाजाने उठाव केल्याने राज्य सरकारची मोठी कोंडी झाली आहे.
तर ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यात यावेत अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावरून मांडली जात आहे. सामाजिक आरक्षणाच्या या मुद्द्यावर ओबीसींची मोट बांधण्यासाठी राज्यातील माळी धनगर व वंजारी समाजातील प्रस्थापित नेत्यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यात ओबीसी प्रवर्गात समाविष्ट असणाऱ्या अठरापगड जातींना देखील सामावून घेण्यात आले आहे. आपले आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम राहावे ही या अठरापगड जातींची मागणी असून जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्यात याच मागणीकडे सत्ताधारी आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले जाणार आहे.
मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे, गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यातील ओबीसी नेते या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.

सिन्नर तालुक्यातील ओबीसी समाज बांधव या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत यासाठी गेल्या आठवड्यावर विविध गावांमध्ये बैठका व भेटी गाठींचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यात धनगर वंजारी व माळी समाजाचे व त्या खालोखाल अठरापगड जातीतील नागरिक आहेत. या सर्वांनी मेळाव्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

समता परिषदेचे राजेंद्र भगत, राजेंद्र जगझाप, मेघा दराडे, डॉ .विष्णू अत्रे, रामभाऊ लोणारे, संदीप भालेराव, संतोष पवार, जयश्री पवार, शेखर कानडे, चंद्रकांत माळी, निवृत्ती पवार, युवा नेते उदय सांगळे, बंडूनाना भाबड, संग्राम कातकडे, बाबासाहेब कांदळकर, विनायक सांगळे, विलास सांगळे, लक्ष्मण बर्गे यांचे सह बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी ओबीसी समाजातील नागरिकांच्या गाठीभेटी घेउन सर्वांनी मेळाव्याला उपस्थित राहावे यासाठी आवाहन करत आहेत.