पुणे, दि. ६ (पीसीबी)- सरकार 1 जुलैपासून संपूर्ण देशात नवा लेबर कोड लागू करणार होती. मात्र काही राज्यांमुळे हा मुद्दा अजून निकालात निघालेला नाही. सध्या 23 राज्यांनी लेबर कोडच्या नव्या तरतुदी स्वीकारल्या आहेत, मात्र इतर राज्यांनी ते अद्याप स्वीकारलेले नाही. सर्व राज्यांमध्ये हा लेबर कोड एकत्र लागू व्हावा अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. जर हे चार लेबर कोड लागू झाले तर नोकरदार वर्गासाठी चार मोठे बदल होतील. कर्मचा-यांचे पगार,साप्ताहिक सुट्ट्या यावर परिणाम दिसेल. लेबर कोडच्या नव्या तरतुदी वेज सोशल सिक्युरिटी, इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि ऑक्युपेशनल सेफ्टी याच्याशी संबंधित आहेत.
नव्या लेबर कोडनुसार, आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सुट्टी अशा तरतूदीचा प्रस्ताव आहे. मात्र त्यामुळे कर्मचा-यांचे कामाचे तास वाढतील. म्हणजे कर्मचा-यांना 8 किंवा 9 नव्हे तब्बल 12 तास काम करावे लागू शकते. या हिशोबानुसार पाहिल्यास कर्मचा-यांना चार दिवसात 48 तास काम करावे लागेल. मात्र त्यानंतर आठवड्यात 3 दिवस सुट्टी मिळेल.
लेबर कोडमध्ये सुट्टी घेण्याबाबत नवीन बदल करण्यात आला आहे. कोणत्याही संस्थेत काम करत असताना कर्मचाऱ्याला दीर्घ सुट्टी हवी असेल तर त्याला 240 दिवस काम करणं बंधनकारक आहे. पण नव्या लेबर कोडमध्ये बदल करण्यात आल्याने आता कर्मचाऱ्यांना 180 दिवस म्हणजे सहा महिने काम करावे लागणार आहे.
कमी पगार हातात येणार
नवा कोड लागू करण्यात आल्याने आता कर्मचाऱ्यांच्या हातात कमी पगार येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या अकाऊंटमध्ये कमी पगार येणार आहे. सरकारने पे रोलबाबत नवे नियम तयार केले आहेत. कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार त्यांच्या एकूण पगाराच्या (सीटीसी) 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असावा, अशी तरतूद नव्या कोडमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे पीएफमध्येही आधीपेक्षा अधिक रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्त झाल्यावर चांगली घसघशीत रक्कम मिळणार आहे.
फुल अँड फायनल सेटलमेंटबाबतही नव्या व्हेज कोडमध्ये तरतूद करण्यात आली आहे. कंपनीची नोकरी सोडल्यास, कंपनीतून काढल्यास, कामावरून कमी केल्यास आणि राजीनामा दिल्यावर दोन दिवसाच्या आत कर्मचाऱ्याला त्याचा पगार देणं बंधनकारक आहे. सध्या व्हेजेजचे पेमेंट आणि सेटलमेंटवर अधिक नियम लागू आहे. त्यात राजीनाम्याचा समावेश आहे.