आणखी सहा आमदार आपल्यासोबत – अजित पवार

0
53

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरु झाल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ६० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. राष्ट्रवादीच्या विद्यमान ५४ आमदारांसह आणखी सहा आमदार आपल्यासोबत आहेत, असा दावा अजित पवार यांनी केल्याचं वृत्त आहे. मात्र भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरुन दादा गटात नाराजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला ६० पेक्षा जास्त जागा लढवायच्या आहेत. अजित पवार यांच्यासोबत ५४ आमदार आहेत. याशिवाय सहा आमदार असल्याचा दावा अजित दादा यांनी काल रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात केल्याचं वृत्त ‘एबीपी माझा’ने दिलं आहे. यामध्ये काँग्रेसचे तीन, शेतकरी कामगार पक्षाचा एक, तर अपक्ष दोन आमदार असल्याची माहिती आहे.

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर यांनी कालच पक्षाला रामराम करत भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यानंतर काँग्रेसला आणखी तीन धक्के बसण्याचे संकेत मिळत आहेत. कारण काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, झिशान सिद्दीकी आणि सुलभा खोडके हेसुद्धा आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.
महायुतीतून बाहेर पडण्याची तयारी, तानाजी सावंतांनी मनातलं बोलून दाखवलं उमेश पाटलांनीही सुनावलं

याशिवाय अपक्ष आमदार देवेंद्र भुयार, संजयमामा शिंदे आणि शेकापचे श्यामसुंदर शिंदे आपल्या सोबत आहेत, असं दादा म्हणाल्याचं वृत्त आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी महायुतीतील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी या तीन प्रमुख पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकारी मेळाव्यात अजित पवार यांनी बोलताना ६० जागांवर हक्क सांगण्याचा उल्लेख केला.

दरम्यान, भारतीय जनता पक्ष विधानसभा निवडणुकीत निम्म्याहून अधिक जागा लढवण्यावर ठाम असल्याचं बोललं जातं. म्हणजे २८८ पैकी १५० जागा लढवण्यावर भाजप अडून आहे. तर जिंकून येईल तीच जागा मिळेल, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सांगितल्यामुळे दादा गटाची नाराजी ओढवण्याचा संभव आहे.