पुणे, दि. २२ : पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असताना हुंड्यापायी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आणखी एका विवाहितेनं आयुष्य संपवलं आहे. पुण्याच्या हडपसरमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दीपा प्रसाद पुजारी असं विवाहितेचं नाव आहे. तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. पुण्यात झालेल्या या आत्महत्यांच्या घटनांमुळे समाजात आजही हुंड्याची प्रथा कायम असल्याचं अधोरेखित झालं आहे.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण ताजं असताना पुण्याच्या हडपसरमध्ये तशीच घटना घडली आहे. मनासारखा हुंडा, मानपान न मिळाल्यानं सासरच्यांनी दीपाचा छळ सुरु केला. या जाचाला कंटाळून विवाहितेनं गळफास घेत आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह सासू, सासरे, दीर यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दीपा पुजारी मृत्यूसमयी केवळ २२ वर्षांची होती. देवकीचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी या प्रकरणात पोलीस तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पोलिसांनी देवकीचा पती प्रसाद पुजारी, दीर प्रसन्ना पुजारी, सासू सुरेखा पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवकी उर्फ दीपाचे वडील मूळचे कर्नाटकचे राहिवासी आहेत.
दीपा आणि प्रसाद यांचा विवाह काही महिन्यांपूर्वीच झाला होता. लग्नात मनासारखा हुंडा न मिळाल्यानं सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरु केला. दीपाच्या कुटुंबियांनी लग्नात ४ तोळं सोनं, १० लाख रुपये दिले होते. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यात आली. त्याच दिवसापासून प्रसाद आणि त्याची आई सुरेखानं लग्नात फ्रीज, भांडी दिली नाहीत, मानपान केलं नाही म्हणत वाद घातला. दीपाला शिवीगाळ केली.