मंचर, दि. ११ (पीसीबी) –
सध्या महाराष्ट्रात राजकीय चढाओढ पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सध्या प्रचाराचा धुराळा उडला आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत. यामुळे सर्वच पक्ष हे जोरदार कामाला लागले आहेत. त्यातच आता सध्या इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहे. नुकतंच जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटीलयांची भेट घेतली. या भेटीनंतर सध्या चर्चांना उधाण आले आहे. आता नुकतंच या भेटीमागील कारण समोर आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी काल रात्री उशिरा माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची भेट घेतली. यावेळी शिवाजी आढळराव पाटील आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर शिवाजी आढळराव पाटील यांनी जयंत पाटील हे फक्त चहा पिण्यासाठी घरी आलो होतो, असे स्पष्टीकरण दिले.
शिवाजी आढळराव पाटील यांचे स्पष्टीकरण
जयंत पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर आपल्या लांडेवाडी येथील शाळेत उतरले. त्यांनी मला फोन केला. त्यावेळी ते मला म्हणाले, मी चहा प्यायला तुमच्या घरी येवू का? मी त्यांना होकार दिला आणि या असे सांगितले. राजकारणात काहीही असूद्या एखादा माणूस चहा प्यायला आपल्याकडे येतो, तर त्याला नाही म्हणायचे का? असा प्रश्न शिवाजी आढळराव पाटील यांनी केला. मात्र मीडियाने लगेचच आढळराव आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यांचा अजेंडा काय, असे एक ना अनेक प्रश्न विचारले. यामुळे उलटसुलट राजकीय चर्चा रंगल्या.
दरम्यान आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार दिलीप वळसे-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शरद पवार गटाकडून देवदत्त निकम यांना उमेदवारी मिळाली आहे. . त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत आंबेगाव विधानसभा मतदारसंघात कुणाचा झेंडा फडकणार? महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी? तसेच दिलीप वळसे पाटील पुन्हा एकदा आपलं वर्चस्व राखणार का? याचे उत्तर २३ नोव्हेंबरलाच समोर येणार आहे