आढळरावांच्या उमेदवारीवर मुख्यमंत्र्यांची चुप्पी, कोणतंही भाष्य नसल्याने शिवसैनिकांत अस्वस्थता

0
193

राजगुरुनगर, दि. ६ (पीसीबी) – महायुतीमध्ये पुणे जिल्ह्यातील फक्त मावळ लोकसभा शिंदे गटाच्या शिवसेनेकडे राहणार असे दिसते. शिरुर लोकसभा मतदारसंघातून महाआघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना उमेदवारी दिल्याने तिथे पुन्हा त्यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी संधी मिळेल अशी जोरदार चर्चा होती. प्रत्यक्षात हा मतदारसंघ राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाकडेच राहणार असल्याचे आज स्पष्ट झाले. आपल्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आढळराव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य मेळावा घेतला पण, त्यात उमेदवारीबद्दल एक शब्दही मुख्यमंत्री बोलले नाहीत. सरकारी योजनांचा उल्लेख करत वेळ मारून नेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आढळराव यांच्या उमेदवारी अथवा शिरुरच्या जागेवर चुप्पी साधल्याने शिवसैनिकांत अस्वस्थता वाढली आहे. शिंदे यांनी सर्व भाषणात राजकीय मार्गदर्शन कऱण्याएवजी तिच ती जुनीच ठाकरेंवरची टीका आणि योजनांची पिंपाणी वाजविल्याने चलबिचल वाढली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानाची शिरूर मतदारसंघातील खेड या ठिकाणाहून सुरुवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवारांनी दावा केलेल्या या मतदारसंघातील शिवाजीराव आढळराव पाटलांच्या यांच्या उमेदरवारीवर मात्र मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत. आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, दीड वर्षापूर्वी मी शिवसेना वाचवण्याची भूमिका घेतली, पण ज्यांनी सातत्याने खोटं बोलनू अनेकांचा अपमान केला त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल.

पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गटाने या आधीच दावा केला असून या ठिकाणाहून इच्छुक असलेले उमेदवार आणि माजी खासदार आढळराव पाटील हे शिंदें गटात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवर काही बोलणार काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढळरावांच्या कामाचे कौतुक केलं, मात्र त्यांच्या उमेदवारीवर कोणतंही भाष्य केलं नाही.

ठाकरेंची साथ सोडून आपण दीड वर्षापू्र्वी शिवसेना वाचवण्याची भूमिका घेतल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, “खोटं बोलून त्यांनी युती तोडली, हजारो लाखो माणसांचा विश्वासघात केला, त्यांनी शिवसैनिकांशी गद्दारी केली, त्यांना आता धडा शिकवायची वेळ आली आहे. आता आपल्या पक्षात रोज लोक प्रवेश करतात, मग मी जर चुकलो असतो तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली असती का? हजारो, लाखो शिवसैनिक विश्वासाने भगवा खांद्यावर घेत आहेत. शिवसेना वाचवण्याची भूमिका मी घेतली.”

शिंदे म्हणाले की, एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा बाळासाहेबांनी केली होती, 1995 साली सत्ता आल्यानंतर बाळासाहेबांनी ठरवलं असतं तर ते मुख्यमंत्रीपदी बसले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. मुख्यमंत्रीपदाची संधी आली त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे यांनी उडी मारून त्या जागी बसले.

आपल्याला महाराष्ट्रातून 45 हून जागा जिंकायच्या असून मोदींचे हात बळकट करायचे आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते म्हणाले की, या पुढच्या निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून एकदिलाने लढवायच्या आहेत. आपल्यासाठी लोकांचे वातावरण चांगलं आहे. विरोधकांकडे काहीही मुद्दे नाहीत. आपण काही बोलत नाही, जर आपण काही बोललो तर विरोधकांना पळता भूई थोडी होईल. त्यांचा योग्य वेळी समाचार घेतला जाईल. येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण 45 हून जास्त जागा लढवू.

अंगणवाडी सेविका यांचा विषय आम्ही हाती घेतला आहे. तो पण सोडवल्याशिवाय राहणार नाही. हे सामान्य लोकांचे सरकार आहे. महिलांना एसटी सवलत दिली, त्याचा फायदा होतोय. शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा लाभ 2 कोटी लोकांनी लाभ घेतला. 1.5 वर्षापूर्वी निर्णय घेतला नसता तर शिवसेना रसातळाला गेली असती.