आठ वर्षात स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठं? सुप्रिया सुळेंचा सवाल

0
340

शिर्डी,दि.०५(पीसीबी) – शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज शिबिरात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्मार्ट सिटीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. आठ वर्षात स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठं? असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
“आज राज्यात असा समज झाला आहे की, राजकीय पक्ष हे केवळ सत्तेसाठी असतात. आपण धोरणकर्ते कमी आणि टीव्ही मनोरंजन करणारे झालो आहोत, असं माझं मत व्हायला लागलं आहे. मला राज्यात सामाजिक परिवर्तन घडवायचं होते. त्यामुळे मी राजकारणात प्रवेश केला. मी आणि माझे सरकारी टीका करायची तेव्हा करतो. मात्र, आमचा भर हा धोरणात्मक चर्चांवर जास्त असतो”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

“स्मार्ट सिटी योजना पहिल्यांदा सुरू झाली, तेव्हा माझ्या सहकारी खासदारांना वाटलं की पिंपरी चिंचवड स्मार्ट होणार म्हणजे सर्व पुणे स्मार्ट होणार. मात्र, आम्ही जेव्हा ही पूर्ण योजना वाचली, तेव्हा लक्षात आलं, की स्मार्ट सिटी म्हणजे पूर्ण शहर स्मार्ट होत नाही, तर स्मार्ट सिटी म्हणजे केवळ ४० हजार लोकांना एक ब्लॉक स्मार्ट होतो. या केंद्र सरकारने गेल्या आठ वर्षात ५० हजार कोटी रुपये हे फक्त स्मार्ट सिटीसाठी आणि ५० हजार हजार कोटी अमृत सिटीसाठी खर्च केले आहेत. त्यामुळे एकूण १ लाख कोटी त्यांनी या योजनेवर खर्च केले आहेत, याचं ऑडीट कोणीतरी करायला हवं, हे एक लाख कोटी रुपये नक्की गेले कुठं? कारण मला या शहरांमध्ये कोणतेही परिवर्तन दिसले नाही. पुण्यात पाऊस पडला आणि लोकांना पुरामुळे घराबाहेर पडणे कठीण झालं. मग हा पैसा गेला कुठं आणि अनेक शहरांमध्ये किती पैसे आले, याची माहिती नाही”, अशी टीकाही त्यांनी केली.

“संजय आवटे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, कारण ते रामाला विसरले. मात्र, मला याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. आम्ही रामाला कधीही विरसलो नाही. राम हा आपल्या मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ‘रामकृष्ण हरी’ म्हटल्याशिवाय महाराष्ट्रातील कोणाचीही सकाळी होत नाही. आपण रामाला विसरलो म्हणून आपला निवडणुकीत पराभव झाला नाही, तर तर टू- जी, कोळशा घोटाळा झाल्याच्या अपप्रचारामुळे आपला निवडणुकीत पराभव झाला”, असेही त्या म्हणाल्या.