0
6

मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी रेल्वेमंत्री सकारात्मक

आठ दिवसात अधिकाऱ्यांसोबत बैठक; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

नवी दिल्ल, दि. 20 पीसीबी – पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका करण्यासंदर्भात लवकरच राज्य सरकार सोबत बैठक घेतली जाईल. लोणावळावरून पुण्याला जाणारी दुपारी दीड वाजताची लोकल पुन्हा सुरू करण्याबाबत जनरल मॅनेजरला निर्देश दिले जातील. अमृत भारत योजनेत कर्जत रेल्वे स्थानकाचा समावेश केला जाईल. मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आठ दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. त्यामुळे प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल असा विश्वास खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वे विभागाच्या चर्चेत खासदार बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न मांडले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार बारणे यांना दालनात भेटण्यासाठी बोलविले. मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न समजावून घेतले. या प्रश्नांबाबत अधिवेशना दरम्यान अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीची माहिती देताना खासदार बारणे म्हणाले, पुणे ते लोणावळा दरम्यानची तिसरी आणि चौथी मार्गिका करण्यासंदर्भात रेल्वेमंत्री वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. ही मार्गिका करण्याबाबत राज्य सरकार सोबत बैठक घेण्याचे नियोजन करण्यासंदर्भात चर्चा केली. ही मार्गिका झाल्यास प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. पनवेल येथे रेल्वेचे जंक्शन होत आहे. या जंक्शनला आताच मेट्रो जोडावी. जेणेकरून नागरिकांना मोठा फायदा होईल. कर्जतपासून लोणावळा पर्यंत नवीन मार्गिका तयार करावी. घाट परिसर कमी करावा.

मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, आकुर्डी, लोणावळा, तळेगाव दाभाडे, पनवेल, नेरळ रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेत कायापालट होत आहे. या योजनेत कर्जत रेल्वे स्थानकाचा समावेश करावा. त्याचा डीपीआर तयार करावा, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली. त्यावर पुढील वर्षी कर्जतचा समावेश केला जाईल अशी ग्वाही मंत्री वैष्णव यांनी दिली. ओव्हर ब्रिज च्या कामाला गती द्यावी. सिडकोने बनविलेल्या रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव आहे. रेल्वे विभागाने सिडकोशी चर्चा करून सुविधा निर्माण कराव्यात, अशा विविध मागण्या केल्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत अधिवेशना दरम्यान अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन मंत्री वैष्णव यांनी दिले.