पिंपरी,दि.२९(पीसीबी)- आठवणी हिमनगासारख्या असतात; परंतु काळाचा खूप मोठा पट मन:पटलावर साकार करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते!’ असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी महाराणा प्रताप गौशाळा सभागृह, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी व्यक्त केले. ज्येष्ठ लेखिका राधाबाई वाघमारे लिखित, संवेदना प्रकाशन निर्मित आणि दिलासा साहित्य सेवा संघ आयोजित ‘जपून ठेवलेल्या आठवणी’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना गिरीश प्रभुणे बोलत होते.
शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. राजेंद्र कांकरिया, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारिणी सदस्य मिलिंद देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक नारायण कुंभार, अशोकमहाराज गोरे, लेखिका राधाबाई वाघमारे, उद्योजक प्रवीण वाघमारे, दीप्ती वाघमारे, दिलासा साहित्य संघाचे अध्यक्ष सुरेश कंक, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
गिरीश प्रभुणे पुढे म्हणाले की, ”जपून ठेवलेल्या आठवणी’ हे आत्मचरित्रपर पुस्तक लक्ष्मीबाई टिळक यांच्या ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्राची आठवण करून देते; कारण राधाबाई यांची लेखनशैली ही साधी अन् अकृत्रिम आहे; तसेच त्यातून सुमारे साठ वर्षांपूर्वीचे पिंपरी – चिंचवड डोळ्यांसमोर उभे राहते. जोतिबा फुले यांनी सावित्रीबाई यांना शिकविले; परंतु राधाबाई यांनी आपल्या पतीला साक्षर केले, हे खऱ्या अर्थाने त्यांच्यातील पुरोगामीपणाचे लक्षण आहे!’ डाॅ. राजेंद्र कांकरिया आणि मिलिंद देशमुख यांनी राधाबाईंचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्यातील योगदान अधोरेखित केले; तर नारायण कुंभार यांनी त्यांच्या लेखनाची समीक्षा केली. लेखिका राधाबाई वाघमारे यांनी आपल्या मनोगतातून सर्वांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
सुभाष चव्हाण यांनी गायलेल्या भावगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. नितीन हिरवे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील, राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, शोभा जोशी, रजनी अहेरराव, अंबादास रोडे, सुलभा सत्तुरवार, बाळकृष्ण अमृतकर, विलास कुंभार, सीमा गांधी, शामला पंडित, आनंद मुळूक, अर्जुन चौधरी, दत्ता कांगळे, दयानंद कुंभार, रघुनाथ केतकर, मनीषा पद्यन, ज्योती पाटील यांच्यासह शहरातील साहित्यिकांची उपस्थिती होती. मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, सुहास घुमरे, फुलवती जगताप, स्वाती भोसले, शामराव साळुंखे, अण्णा गुरव, जोतिबा ढेकळे, सार्थक थोरवत, सुभाष सोळंकी यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले