आझमभाई पानसरे पुन्हा प्रकाशात, चमत्कार होणार ?

0
385

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या पार्श्वभूमिवर माजी महापौर आझमभाई पानसरे यांनी घेतलेली भूमिका अनेक अर्थांनी महत्वाची समजली जाते. मुळात पानसरे हे अगदी सुरवातीपासून शरद पवार यांचे कट्टर समर्थक. त्यांचे वडिल फकिरभाई यांच्या अकाली निधनानंतर भाई बिनविरोध महापौर झाले. गावकिभावकी मध्ये पानसरे यांच्या सारखा हाडाचा कार्यकर्ता महापौर होण्यामागे शरद पवार यांचा मोठा हात होता. तेव्हापासून पानसरे नावाचे एक वादळ निर्माण झाले. भाईंचा असा एक स्वतंत्र चाहता वर्ग आहे. जात, भाषा, धर्म या पलिकडे जाऊन राजकारण करण्याचा शरद पवार यांचा आदर्श आझमभाईंनी सुरू ठेवला. बहुजनांचे आधरवड म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले. मावळ लोकसभा निवडणूक मोठ्या चुरशीने ते लढले, पण तिथे हिंदु- मुस्लिम असे ध्रुवीकरण आडवे आले. विधानसभा लढली पण तिथेही पूर्ण गावकी विरोधात एकवटली आणि भाईंचा पराभव घडवून आणला. पराभवाचा इजा, बिजा, तिजा झाला पण भाईंचा वचक कायम राहिला. ते स्वतः आमदार-खासदार होऊ शकले नाही मात्र, त्यांनी जिकडे वजन वापरले तोच उमेदवार निवडूण आल्याचे अनेक दाखले आहेत. सत्तेत आणि नंतर विरोधातही आझमभाईंचे उपद्रवमुल्क कायम टिकून राहिले. आपल्या समर्थकांना न्याय मिळत नसल्याने काही काळ त्यांनी बंडाचा झेंडा उभारला होता, तेव्हा तर शहराचे राजकारण सैरभैर झाले होते. गेली पाच वर्षे ते दुर्धर आजाराशी झूंज देत आहेत, पण समाजकार्याची जिद्द आजही कायम आहे. लोकसभा असो वा विधानसभा आझमभाई कोणाच्या बाजुला यावर विजयाचा तराजू कुठे झुकणार याच्याच बातम्या येत असतं. राष्ट्रवादी फुटली आणि अजित पवार यांनी वेगळी चूल मांडली. शहरातील तमाम लाभार्थी आजी-माजी नगरसेवक दादांच्या बरोबर गेले. आझमभाई गेली तीन महिने तसे तटस्थच होते. साहेबांचे वयच्या ८२ मध्ये चिकाटीने फिरणे आणि पुन्हा नव्या दमाने पक्ष उभा कऱण्याची जिद्द आझमभाईंनाही स्वस्त बसू देईना. खूप विचार केला आणि अखेर त्यांनी पवार साहेबांचीच पालखी खांद्यावर घेतली. भाई साहेबांकडे गेले, साहेबांच्या बंगल्यावर त्यांनी आयुष्याच्या शेवटापर्यंत शरद पवार साहेबांचेच समर्थन कऱण्याचे जाहीर केले तसे दादा समर्थक हादरले. कारण, आजारपणातही आझमभाई शहर पिंजून काढायची भाषा करतात. बहुजन आणि अल्पसंख्य समाजात आजही त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकित साहेबांच्या उमेदवाराचाच प्रचार कऱण्याचा निर्धार आझमभाईंनी केल्याने अजितदादा समर्थक काहीसे अस्वस्थ आहेत.

मावळातून सुरवातीला शिवसेनेकडून श्रीरंग बारणे विजयी झाले त्यावेळी आझमभाईंनी पक्षाचा विचार न करता उघडपणे बारणे यांचे समर्थन केले होते. भोसरी मतदारसंघात महेश लांडगे अपक्ष उमेदवार असताना आझमभाईंचे वजन त्यांना लांडगे यांच्या पारड्यात टाकले आणि आमदार निवडूण आणला. पिंपरी राखीव मतदारसंघातसुध्दा त्यांचाच चेला अण्णा बनसोडे यांची पहिला विजय हा केवळ आझमभाई पानसरे यांच्या प्रभावामुळे झाला होता. भाईंचे समर्थक असलेले जगदिश शेट्टी यांच्या पासून राजाराम कापसे यांच्या पर्यंत सर्वांना कोणते ना कोणते पद मिळाले होते. पानसरे यांची ताकद ओळखूनच दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी त्यांनी भाजपकडे नेले होते. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी पानसरे यांच्याबरोबर न्याय कऱणार असे आश्वासन दिले होते. केवळ मुस्लिम असल्याने कर्तृत्व असूनही अखेरपर्यंत भाईंना झुलवत ठेवले. विधान परिषद देतो म्हणाले पण तिथेही डावलले. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि तेव्हापासून आझमभाई थोडे तटस्थ झाले. भाजपची सत्ता असताना पुन्हा एकदा त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महामंडळ देणार असे सांगितले गेले, पण वारंवार आश्वासन देऊनही पाळले नाही. त्यानंतर त्यांना भाजपला रामराम केला आणि पुन्हा स्वगृही परतले. दरम्यान, आजारपणाने घेरले म्हणून ते सार्वजनिक जीवनातून थोडे अलिप्त झाले. आता साहेब संकटात आहे म्हटल्यावर पुन्हा नव्या दमाने मैदानात उतरण्याची उमेद बाळगून ते रिंगणात उतरलेत. खरा तर, आझमभाई हे कायम साहेबांचेच समर्थक राहिल्याने अजितदाद पवार यांचे आणि भाईंचे सूर कधी जुळलेच नाहीत. मावळ लोकसभा आणि चिंचवड विधानसभेच्या आपल्या पराभवाला अप्रत्यक्षपणे दादांचा हातभार असल्याचीही चर्चा कायम होई. आता आझमभाई साहेबांच्या बाजुने खंबीरपणे उभे राहिलेत. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेत पानसरे यांचे वजन किती कामी येणार ते आता काळच ठरवेल. एक मात्र नक्की झाले आता अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांचे टेन्शन वाढले आहे.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाची उद्योगनगरीची जबाबदारी सोपविलेले युवा आमदार रोहित पवार यांनी आपल्या दुसऱ्या शहर दौऱ्यात गणेशोत्सवात (२३ सप्टेंबर) आझमभाईंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. आझमभाईंच्या पाठिंब्य़ाची बीजे त्या भेटीतच रोवली गेली होती. कारण त्यावेळी आ. रोहित यांची भाईशी बंद दाराआड चर्चा झाली होती. त्यानंतर तरुण शहराध्यक्ष तुषार कामठे आणि त्यांचे सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, शिरीष जाधव, काशिनाथ जगताप, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, राजन नायर, देवेंद्र तायडे, प्रशांत सपकाळ हे सहकारी आझमभाईंच्या सातत्याने संपर्कात होते. आता भाईंच्या पाठिंब्याने अजित पवार गटाची चिंताही वाढणार, यात शंका नाही.

आझमभाईनंतर त्यांच्या समर्थक माजी नगरसेवकांचीही घरवापसी?
आझमभाई यांना मानणारा मोठा वर्ग शहरात अल्पसंख्याक नाही, तर बहुसंख्याकांतही आहे. गत टर्ममध्ये त्यांच्या विचाराचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत आहेत. त्यांच्या या समर्थकांचीही येत्या काही दिवसांत घरवापसीचे संकेत मिळाले आहेत. पवारसाहेबांचे कट्टर समर्थक असलेले आझमभाई हे अजितदादांनी बेदखल केल्यामुळे भाजपमध्ये गेले होते.
अजितदादामुळे दुखावलेल्या आणखी काही जणांची येत्या काही दिवसांत घरवापसी होणार आहे, असे शरद पवार गोटातून सांगण्यात आले. पवारसाहेबांच्या धोरणी निर्णयाने पिंपरी -चिंचवड मिनी इंडिया म्हणून ओळखले जाते. यामुळेच मी त्यांच्यासोबत आलो आहे, अशी प्रतिक्रिया आझमभाईंनी दिली. आता कामठेंसोबत भाजपकडून पालिकेची सत्ता खेचून आणणार आहे, असा मोठा दावा त्यांनी केला.

पिंपरी विधानसभेत आमदार. बनसोडेंचे टेन्शन वाढणार
आझमभाईंचा करिष्मा शहरात आणि त्यातही पिंपरी विधानसभेत जास्त आहे. तेथील एकगठ्ठा मते ते वळवू शकतात,एवढे तेथे त्यांचे प्रभुत्व आहे. त्यामुळे तेथील अजितदादांचे समर्थक विद्यमान आमदार बनसोडेंचे टेन्शन वाढले आहे. त्यांचा भरवसा ज्या मतांवर आहे, ती आझमभाईमुळे आता फिरण्याची मोठी शक्यता आहे. त्यात बनसोडेंच्या झोपडपट्टी आणि अल्पसंख्याक मते त्यात असणार आहेत, तर दुसरीकडे त्याचा फायदा शरद पवार राष्ट्रवादीला पिंपरीत होणार आहे. आपला आमदार पिंपरीत करण्याचा शहराध्यक्षांचा दावा यामुळे अधिक बळकट झाला आहे. तेथील त्यांच्या इच्छुकांना आता हत्तीचं बळ मिळाल्याने ते दुप्पट उत्साहाने तयारीला लागणार, यात वाद नाही. एकूणच आझमभाईंमुळे पिंपरीत विधानसभेला समीकरण आता बदलणार आहे.