आज हे माल लुटणारे जेलमध्ये सडत आहेत

0
169

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज लातूरमध्ये सभा पार पडली. महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मोदींची आज लातूरमध्ये सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सडकून टीका केली. “काँग्रेस सरकारच्या काळात प्रत्येक दिवशी सकाळी वृत्तपत्रांमध्ये रोज नवे घोटाळे वाचायला मिळायचे. हेडिंग असायचं कोलगेट, कोळशामध्ये इतक्या लाख कोटींचा घोटाळा. आता हेडलाईन काय असते? आज भ्रष्टाचारांची हेडलाईन असते. आज इथून इतके कोटी रुपये पकडण्यात आले. आज एवढे कोटी रुपये तिथून पकडण्यात आले. आज नोटांच्या गठ्ठ्या गादीमधून सापडल्या. आज इतक्या रुपयांचा घबाड गॅरेजमध्ये सापडलं. या बातम्या येतात की नाही? तुम्ही मला या कामासाठी बसवलं आहे की नाही? हे काम मला करायला हवं की नको? आज हे माल लुटणारे जेलमध्ये सडत आहेत. मी देशाच्या नागरिकांना आश्वासित करु इच्छितो, ज्यांनी देशाला लुटलं आहे त्यांना ते पैसे परत करावेच लागतील. ही मोदीची गॅरंटी आहे”, असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला.

“आपल्या देशाचे लोक नेहमीच मेहनती राहिले आहेत. आपल्या देशाचे तरुण नेहमी टॅलेंटेड राहिले आहेत. पण काँग्रेसने 60 वर्षांपर्यंत भारतीय तरुणांच्या स्वप्नांना तुडवण्याचं पाप केलं आहे. काँग्रेसने फक्त एका कुटुंबाचा विचार केला आहे. पण मोदी देशाच्या प्रत्येक कुटुंबाचा विचार करतो. माझा भारत, माझं कुटुंब. आम्ही जुने नियम सोपे करत आहोत. गेल्यावर्षी आम्ही 40 हजार पेक्षा जास्त कप्लायन्सिसला संपवलं आहे. आज जेव्हा देशाच्या नागरिकांवरील हे ओझं दूर झालं आहे तेव्हा ते सुद्धा प्रत्येक सेक्टरमध्ये चांगला प्रयत्न करत आहेत”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“भारताचे खेळाडू आज विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ऐतिहासिक रेकॉर्ड तोडत आहेत. भारताच्या नागरिकांमध्ये आलेला विश्वास आम्हाला विकसित भारताच्या लक्ष्यापर्यंत पोहोचवेल. माझं स्वप्न आहे की, 2029 मध्ये युवा ऑलम्पिक भारतात व्हावी, माझं स्वप्न आहे, 2036 मध्ये भारतात ऑलम्पिकची स्पर्धा व्हावी. मोदी लहान विचार करुच शकत नाही. या परमात्माने मला मॅनुपॅक्चर केलं तेव्हा छोटीवाली चीप ठेवलीच नाही, मोठीवाली चीप ठेवली आहे”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

‘काँग्रेस आपल्या व्होटबँकेला आरक्षण देऊ इच्छित’
“लातूरची ही भूमी आम्हाला शिकवण देते की, मोठ्यातल्या मोठ्या संकटातून कसं बाहेर पडता येतं. आमच्या देशातही कोट्यवधी लोक असे आहेत, ज्यांनी पिढ्यांपिढ्या खूप संकट सोसले आहेत. अशा साथीदारांसाठीच संविधानात आरक्षणाची व्यवस्था केली गेली होती. एक अशी व्यवस्था आहे ज्यामधून कुणीच हक्क हिसकावू शकत नाही. माझा तर दावा आहे खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊनही हिसकावू शकत नाही. पण काँग्रेस एससी, एसटी, ओबीसींचं आरक्षण कमी करुन आपल्या व्होटबँकेला देऊ इच्छित आहे”, असा आरोप नरेंद्र मोदींनी केला.

“काँग्रेसच्या यावेळेच्या वचननाम्यात मुस्लिम लीगची छाप आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या लोकांना, लातूरच्या लोकांना काँग्रेसपासून सावध होण्याची गरज आहे. काँग्रेसने कधीच एससी, एसटी, ओबीसी नेतृत्वाला पुढे जाऊ दिलं नाही. काँग्रेस मोदीवर चिडण्याचं कारण हे सुद्धा आहे की, मोदी दलित, पीडित, शोषित, वंचितांची बात करतो. गेल्या 10 वर्षात एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे सर्वाधिक आमदार आणि खासदार भाजप आणि एनडीएसोबत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात 60 टक्क्यांपेक्षा जास्त मंत्री हे एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आहेत. आज देशाचा एससी, एसटी, ओबीसी समाज मोदीवर यासाठी विश्वास ठेवतो कारण गेल्या 10 वर्षात अशा कोट्यवधी कुटुंबांचं आयुष्य बदललं आहे. कुणाला मोफत राशन मिळालं, कुणाला मोफत उपचार मिळाले, असे कोट्यवधी सहकारी आहेत, ज्यांना अनेक पिढ्यांनंतर पहिलं पक्क घर दिलं”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.