आज याला संपवूनच टाकतो; डिलिव्हरी बॉईज टोळक्याचा सोसायटीत राडा

0
162

रावेत, दि. 08 (पीसीबी): सोसायटी मध्ये पार्सल देण्यासाठी आलेल्या डिलिव्हरी बॉयला पॅसेंजर लिफ्टचा वापर न करता सर्विस लिफ्टचा वापर करण्यास सुरक्षा रक्षकाने सांगितले. त्या कारणावरून डिलिव्हरी बॉयने त्याच्या 20-25 साथीदारांना घेऊन येत सोसायटीमध्ये राडा घातला. सुरक्षारक्षकासह चौघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी दिनांक सात सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास पुना व्हिले सोसायटी, पुनावळे येथे घडली.

सुरक्षा रक्षक मोहम्मद अश्रफ मोहम्मद शफी (वय 27, रा. पुनावळे. मूळ रा. जम्मू-काश्मीर), सुपरवायझर प्रभाकर पांडे, एरिया सुपरवायझर ज्ञानदेव भोगील, सुरक्षारक्षक मेहबूब शेख अशी जखमींची नावे आहेत. मोहम्मद अश्रफ मोहम्मद शफी यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी मारुती परसराम वराडे (वय 20, रा. जांबे, ता. मुळशी), केदार जितेश बनसोडे (वय 19, रा. वाकड), गोपाल सिद्धेश्वर बोरावडे (वय 26, रा. पुनावळे), प्रियंकसिंग सुरेंद्रसिंग तोमर (वय 23, रा. हिंजवडी), रजाक इरशाद खान (वय 25, रा. देहूरोड), सुनील विठ्ठल गवळी (वय 20, रा. जांबे, ता. मुळशी), राहुल गोपाळ बोरवडे, सुनील सिद्धू बोधणे (वय 20, रा. मामुर्डी, ता. मावळ) आणि इतर 14 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारुती वराडे हा झेप्टो कंपनीचा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो शनिवारी सकाळी पुना व्हिले सोसायटी, पुनावळे येथे पार्सल देण्यासाठी आला. त्यावेळी तिथे नेमणुकीस असलेले सुरक्षारक्षक फिर्यादी यांनी त्यास पॅसेंजर लिफ्टचा वापर न करता सर्विस लिफ्टचा वापर करण्यास सांगितले. या कारणावरून आरोपीने चिडून त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेतले. ‘आज याला संपवूनच टाकतो’ असे म्हणून दोघांनी फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले.

इतर पाच ते सहा जणांनी फिर्यादी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी सुपरवायझर प्रभाकर पांडे आले. त्यांना देखील आरोपींनी दगडाने, लाथाबुक्क्यांनी तसेच एरिया सुपरवायझर ज्ञानदेव भोगील व सुरक्षारक्षक मेहबूब शेख यांना देखील पंधरा ते वीस मुलांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.