आजी-माजी खासदार शिंदे गटात गेल्याने शिवसैनिक आक्रमक; गुरुवारी आंदोलन

0
250

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपसोबत सरकार स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाल्याचे पडसाद पिंपरी-चिंचवडमध्ये उमटू लागले आहेत. पदाधिका-यांनी आज एक बैठक घेतली. आजी-माजी खासदारांविरोधात तीव्र भावना व्यक्त करत उद्या आंदोलन करण्याचे निर्धार केला. दरम्यान, या बैठकीला माजी नगरसेवक उपस्थित नव्हते.

आकुर्डीतील शिवसेना भवनात झालेल्या बैठकीला शहरप्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संघटिका उर्मिला काळभोर, जिल्हा संघटिका शैला खंडागळे, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके यांच्यासह विभागप्रमुख, शाखाप्रमुख असे सुमारे 200 पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही मंगळवारी हा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयाचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरात उमटू लागले आहेत. तातडीने आज पदाधिका-यांनी बैठक घेतली. आजी-माजी खासदारांविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. शिंदे गटात सहभागी झाल्याने आजी-माजी खासदारांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

शहरप्रमुख सचिन भोसले म्हणाले, ”आजी-माजी खासदार शिंदे गटात गेल्याने त्यांच्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. शहर शिवसेनेच्या वतीने निष्ठावंत शिवसैनिक उद्या (गुरुवारी) गद्दारांविरोधात निषेध आंदोलन करणार आहेत. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळी 12 वाजता आंदोलन होणार आहे. आजची बैठक पदाधिका-यांची होती. त्यामुळे माजी नगरसेवक बैठकीला उपस्थित नव्हते. सर्व पदाधिकारी होते. बाहेर असल्याने शिरुरच्या महिला संघटिका सुलभा उबाळे बैठकीला हजर नव्हत्या”.