चिखली, दि. 18 (पीसीबी)
चिखली येथील प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेत आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. शाळेच्या द्विदशकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने हा मेळावा आयोजित केला होता. सुमारे 100 आजी आजोबा यावेळी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक सचिव श्री यादवेंद्र जोशी व अध्यक्ष मदनलाल कांकरिया हे यावेळी उपस्थित होते.
प्राथमिक व माध्यमिक च्या निवडक विद्यार्थ्यांनी नृत्यद्वारे गणेश वंदना सादर केली. सहावी व सातवीच्या मुलींनी स्वागत गीत सादर केले. बाल वर्गाच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन प्रदर्शन केले. कृष्णा कृष्णा हे बडबड गीत विद्यार्थ्यांनी सादर करून गोष्टी सांगितल्या व गाणी म्हटली.
संगीत व नाटकांनी कार्यक्रमात रंगत आणली. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांनी तबल्यांची जुगलबंदी करून दाखवली. पथनाट्याद्वारे पर्यावरण जागृतीचा संदेश दिला.
शिक्षकांनी आजी-आजोबांना काही प्रश्न विचारले व त्याची उत्तरे त्यांनी दिली. संस्कारांमुळे या शाळेची मुले कधीही वाया जाणार नाहीत असे आजी आजोबा म्हणाले. आई-वडिलांनी सोशल मीडिया व टीव्हीवर बंधने घातली पाहिजेत असे मत मांडले. शाळेबद्दल बहुसंख्य आजी-आजोबांनी गौरवोद्गार काढले.
समारोपाच्या भाषणात या दवेंद्र जोशी म्हणाले की, आपल्या देशातील कुटुंब पद्धतीमुळे हा देश एकसंघ आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे समाज टिकून आहे. शहरात आजी आजोबांची उणीव जाणवते. मुलांकडे पुरेसं लक्ष देण्याची जबाबदारी नोकरीमुळे आई वडील पार पाडू शकत नाहीत. कुटुंबात आजी आजोबांच्या संस्काराने नातवंडे चांगली निघतात. आणि घरपण जपले जाते.
शिक्षिका नीता शिवतारे व रोहिणी खोत यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य अपर्णा गोवंडे यांनी प्रास्ताविक केले