आजीला लागली झोप आणि खेळताना चिमुरडी पडली ५० फूट खोल विहिरीत

0
317

पुणे,दि.०६(पीसीबी) – जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या एका मेंढपाळाची 6 वर्षीय लहानगी मुलगी खेळताना पाय घसरुन 50 फूट खोल विहिरीच्या पाण्यात पडून बुडाली होती. मात्र ही बाब कोणाच्याही लक्षात आली नाही. मात्र तबल 28 तासांनी रविवारी सायंकाळी या मुलीचा मृतदेह विहिरीच्या पाण्यातून बाहेर काढण्यात जुन्नर येथील आपत्कालीन व्यवस्थापन टीमला यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजाबाई संतोष दगडे ( वय 6 वर्षे) असं विहिरीतील पाण्यात बुडून मृत झालेल्या लहान मुलीचे नाव आहे. निरगुडसर येथील बाम्हणदरा येथील जारकरवाडी ते मेंगडेवाडी मंचर रस्त्याच्या बाजूला ओढ्याच्या कडेला शेतकरी सुरेश किरवे यांच्या मालकीची विहीर आहे. मेढपाळ संतोष लालु दगडे यांची मेंढरे ओढ्यावरील पाणी पिण्यासाठी आली. पाणी पिल्यानंतर मेंढ्या झाडाच्या सावलीत बसल्या होत्या. मुलीचे वडील गावात गेले होते. झाडाखाली मुलीची आजी सुमनबाई लालू दगडे, मृत झालेली मुलगी जिजाबाई दगडे या दोघीच होत्या. मुलीच्या आजीला झोप लागली असल्याने मुलगी झाडाखाली खेळत असताना शेजारील विहिरीत मुलीचा तोल गेला आणि ती 50 फूट खोल विहिरीमध्ये पडून पाण्यात बुडाली.

ही घटना शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली होती. मात्र कोणाच्याही लक्षात आली नाही. मुलीचे वडील संतोष दगडे यांनी शनिवारी दिवसभर मुलीचा शोध घेतला परंतु मुलगी सापडली नाही. त्यांनी याबाबत मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. रविवारी सकाळी मेंढपाळ आणि ग्रामस्थांनी विहिरीमध्ये शोध घेतला असता मुलीची ओढणी पाण्यात तरंगतांना आढळून आली. विहिरीतून मुलीला बाहेर काढण्यासाठी समिर मेंगडे आणि निरगुडसरचे सरपंच आनंदराव वळसे यांनी जुन्नर येथील आपत्कालीन व्यवस्थापन टीमला कळविले.

रविवारी सकाळी मंचरचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सकाळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश होडगर आणि जमादार टि.एस.मोरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने मुलीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. परंतु, यश आले नाही त्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन टीमने मुलीला बाहेर काढण्यासाठी विहिरीतील पाण्यात जावून प्रयत्न केला. परंतु विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांनी पाणी उपसा करण्यासाठी 3 विद्युत (मोटारी ) पंप आणून पाणी उपसण्यासाठी सुरुवात केली. सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास विहिरीच्या पाण्यात मूत्यू झालेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.