आजही लोकांच्या माध्यमांकडून खूप अपेक्षा आहेत

0
202

पुणे, दि. २१ (पीसीबी) : माध्यमांवर विविध प्रकारे दबाव असतात. तुम्ही जर या दबावाला शरण गेला तर लोकांच्या नजरेतून उतराल. शरण गेला नाहीत तर तुम्हाला ठिकठिकाणचे दरवाजे बंद होतील. मात्र, आजही लोकांच्या माध्यमांकडून खूप अपेक्षा आहेत.आपण त्या सगळ्या पूर्ण करू शकत नाही. तरीही लोकांचा अजूनही माध्यमांवर असलेला विश्‍वास आपण सार्थ ठरवायला हवा, असे मत ‘द प्रिंट’चे संस्थापक-संपादक शेखर गुप्ता यांनी आज पुण्यात व्यक्त केले.

‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परूळेकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात गुप्ता बोलत होते. ‘माध्यमे-लोकशाहीचा चौथा स्तंभ : वास्तव आणि अपेक्षा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, संपादक-संचालक श्रीराम पवार, पुणे ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणवीस यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्रसैनिक आणि पत्रकार (कै) ना. अ.पेंडसे पुरस्कृत डॉ.नानासाहेब परूळेकर स्मृती पुरस्कारांचे वितरण यावेळी गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

दत्ता देशमुख (वरिष्ठ बातमीदार – बीड), ब्रिजमोहन पाटील (बातमीदार – पुणे), सुधाकर पाटील (बातमीदार – जळगाव),संजीव भागवत (बातमीदार – मुंबई), महेश बर्दापूरकर (पुणे, ले आऊट आणि ग्राफिक्स), कोल्हापूर आवृत्ती ले आऊट आणि ग्राफिक्स), बी. डी. चेचर (छायाचित्रकार – कोल्हापूर), ज्ञानेश्वर हिंगोलीकर (साम टिव्ही),आनंद बोरा (डिजिटल नाशिक) यांना गुप्ता यांच्या हस्ते परूळेकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गुप्ता म्हणाले, ‘‘ पत्रकारिता हे संवेदनशील क्षेत्र आहे. याचा विचार करून पत्रकारांनी काम करायला हवे. बातमी मिळविण्यासाठी आपण लोकांना भेटतो. त्याला आपण सोर्स म्हणतो. वास्तविक त्यांना सोर्स म्हणणे चुकीचे आहे. कारण ती व्यक्ती त्याच्याकडील महत्वाची वेळ आपल्यासाठी देत असते.शेवटी वाचकांचा विश्‍वास महत्वाचा असतो. काम करीत असताना तो जपण्याची गरज असते.’’

भारतात सुरवातीला राजकीय पक्षांची मुखपत्रे होती. दुसऱ्या फेजमध्ये काही इंग्रजी वृत्तपत्रे आली.पुढे स्वातंत्र मिळाल्यावर ही परिस्थिती बदलत गेली. १९७५ मध्ये आणीबाणी लावण्यात आली आणि मग लोकांना रोज काय वाचायचं हा प्रश्न पडायला लागला.मात्र, त्यानंतर माध्यमात पहिली क्रांती झाली. माध्यमांचे स्वातंत्र्य मानण्यात आले. कोरोना काळात दोन वर्ष वर्तमानपत्र जवळपास बंद होती. मात्र, त्यानंतरही विश्वासाने लोकांनी पुन्हा वर्तमानपत्र घेण्यास सुरुवात केली, हे आपण लक्षात घ्यायला हवे, असे गुप्ता यांनी सांगितले.
गुप्ता म्हणाले, ‘‘ वर्तमानपत्रांचे उत्पन्न कमी होत आहे, विक्रीही कमी होत आहे.डिजिटलवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यातही आपल्या वाचकाला काय आवडेल याचा विचार केला जात आहे. याचा आपल्यावर जास्त परिणाम होतोय.कारण आपली लोकशाही तरुण आणि अपरिपक्व आहे. आपल्याकडे अनेक मुद्द्यावर ध्रुवीकरणाचा धोका अधिक आहे, व्यवस्थेचा ढोबळपणा अधिक आहे. त्यामुळे अनेक आव्हाने आहेत. या सगळ्याशी संघर्ष करावा लागणार आहे.त्यामुळे आता आपल्यातल्या प्रत्येकाला पुढे यावे लागणार आहे.’’