मुंबई, दि. २२ (पीसीबी) : महाराष्ट्रातील चाळीस शिवसेना आमदारांच्या बंडानंतरचे सत्तांतर घटनात्मक आहे की घटनाबाह्य यावर मंगळवारी (ता. २३) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. खंडपीठातील एक न्यायाधीश उपलब्ध नसल्याने उद्या (ता. २२) होणारी सुनावणी एक दिवस पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. पक्षांतर बंदी कायदा आणि शिवसेना आमदारांचे बंड यामुळे या सुनावणीच्या निर्णयाची कमालीची उत्सुकता लागलेली असून, पक्षांतर्गत लोकशाहीच्या संबधात या प्रकरणाचा निर्णय देशाच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणार असल्याचे मानले जाते.
याबाबतचा आतापर्यंतचा अनुभव पाहता सुनावणीत निर्णय होणार की, घटनापीठाची स्थापना करून सुनावणी लांबणीवर पडणार, याबाबतही संभ्रम कायम असल्याचे दावे करण्यात येत आहेत. तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांनी शिवसेनेच्या सोळा आमदारांना अपात्रतेबाबतची नोटीस काढली होती. तर शिंदे गटाच्या प्रतोदांनी शिवसेनेसोबत राहिलेल्या पंधरा आमदारांना व्हिप नाकारल्याची नोटीस काढली आहे. त्यावरून, खरी शिवसेना शिंदे यांची की ठाकरे यांची यावरून सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व्ही. रमण्णा येत्या २६ ऑगस्टला निवृत्त होणार असून ते जाता जाता या प्रकरणावर अंतिम निर्णय देतील की नाही, याबाबत अंदाज बांधला जात आहे. दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज याबाबत बोलताना, जे सर्वोच्च न्यायालयात होईल ते पाहू. अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास असून नक्कीच न्याय मिळेल असे ते म्हणाले. या प्रकरणाचा निर्णय केवळ महाराष्ट्राच्या सत्तेसाठीच महत्वाचा नाही तर, देशातील लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचा असल्याची भावना ठाकरे यांनी व्यक्त केली.