आचार्य अत्रे रंगमंदिर खासगी संस्थेला चालवायला देण्याची प्रक्रिया थांबवा; अन्यथा जनआंदोलन – सुजाता पालांडे

0
182

पिंपरी दि. २६ (पीसीबी) – पिंपरी, संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी चालवायला देण्याचा घाट पिंपरी-चिंचवड महापालिकेने घातला आहे. थिएटर वर्कशॉप या खासगी संस्थेचे लाड पुरविण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता त्याला मान्यता दिली जात आहे. या पाठीमागे केवळ संस्थेचे हीत जोपासण्याचा उद्देश महापालिका अधिकाऱ्यांचा दिसत आहे. या संस्थेला असे रंगमंच चालविण्याचा कोणताही अनुभव नाही. तसेच इतर सभागृह किंवा रंगमंदिर चालविण्यास न देता केवळ आचार्य अत्रेच खासगी संस्थेला चालवण्याचा चुकीचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया ताबडतोब थांबवावी, अन्यथा या निर्णयाविरोधात जनआंदोलन छेडू, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश प्रसिद्धीप्रमुख सुजाता पालांडे  यांनी दिला. 

याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात पालांडे यांनी म्हटले आहे की, शाळेतील स्नेहसंमेलन, सभा, विविध कार्यक्रम घेता यावेत, यासाठी आचार्य अत्रे रंगमंदिर महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आले. त्याची डागडुजी करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. महापालिकेने अधिकचा खर्च केला असता तर आणखीन सुसज्ज झाले असते. मात्र महापालिकेने अधिकचा खर्च करण्यास नकार दिला. सध्या कार्यक्रमांसाठी हे रंगमंदिर सुरु करण्यात आले आहे. येथील दर सर्वसामान्य नागरिकांना कार्यक्रमासाठी परवडणारे आहेत. ऑक्टोबर ते मार्च दरम्यान कार्यक्रमांची संख्या देखील अधिक असते. मात्र महापालिकेने खासगी संस्थेला आचार्य अत्रे चालवायला देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

याबाबतचा प्रस्ताव प्रशासकांच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला आहे. कमी भाडे असल्यामुळे हे रंगमंदिर  सदरची संस्था घेत आहे. या संस्थेला अशी मोठी सभागृहे चालविण्याचा कोणताही अनुभव असल्याचे दिसत नाही. खासगी संस्थेच्या सोयीसाठी या रंगमंदिरात सुविधा देण्यासाठी सुमारे 40 लाखांचा खर्च करायला महापालिका तयार आहे. मात्र पूर्वी डागडुजी करायला पैसे नसल्याचे सांगून दुटप्पी भूमिका घेत आहे. या संस्थेला रॅम्प, पार्किंग, कँटीन आणि पार्किंगसाठी दोन लेन देखील देण्याचे ठरले आहे. या बरोबरच खालील हॉल, ग्रंथालय देखील दिले जाणार आहे. या सुविधा देण्याबाबत तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी मंजुरी दिलेली नसल्याचे समजते. तरीही ते दिले जाणार आहे. या खासगी संस्थाद्वारे नंतर इतरांना भाड्याने रंगमंदिर देऊन अधिकचे पैसे उकळण्याचा डाव दिसत आहे.

त्याचा महापालिकेला कोणताही फायदा होणार नाही. तसेच थेट पद्धतीने त्या संस्थेला न देता त्याची निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे. केवळ आचार्य अत्रे रंगमंदिर खासगी संस्थेला न देता शहरातील सर्वच सभागृहे निविदा प्रक्रिया राबवून खासगी संस्थेला द्यावीत, अशी मागणी पालांडे यांनी केली. या बाबत सकारात्मक विचार करून, ही प्रक्रिया थांबवावी. अन्यथा नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला आहे.