आचार्य अत्रे मराठी नाट्यसृष्टीतील महान नाटककारडॉ. शिवाजीराव कदम: आचार्य अत्रे नाट्यमहोत्सव सुरु

0
94

पिंपरी, दि. ३० : साहित्यसम्राट आचार्य अत्रे मराठी नाट्यसृष्टीतील महान नाटककार होते. युरोपातील श्रेष्ठ नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी एकुण ३७ नाटके लिहिली व आचार्य अत्रे यांनी २५ नाटके लिहिली. त्यांची नाट्यकृती जोपर्यंत रंगमंचावर आहे, तोपर्यंत ते जिवंत आहेत. लोकप्रिय नाटके लिहिणारे अत्रे म्हणूनच महान होते, असे प्रतिपादन विचार भारती विद्यापीठाचे कुलपती प्राचार्य डॉ. शिवाजीराव कदम यांनी सोमवारी व्यक्त केले.


आचार्य प्र. के अत्रे यांच्या जन्माचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पुरंदर येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व भारती विद्यापीठ, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे नाट्यमहोत्सव पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात आयोजित केला आहे. संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात उदघाटन सोहळा झाला. डॉ. कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नाट्य महोत्सवाची सुरुवात झाली. उदघाटनप्रसंगी डॉ. कदम बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील होते. यावेळी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर व अत्रे प्रेमी शशिकांत इनामदार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर, मुख्य अभियंता रामदास तांबे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उद्योजक गोविंद पानसरे, भरत नाट्य संशोधन मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सायली नढे उपस्थित होते.


डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘आचार्य अत्रे पत्रकार, लेखक, नाटककार, चित्रपटकार होते. यांची साहित्य संपदा आजही लोकप्रिय आहे. आचार्य अत्रे लिखित ” श्रीं “ची इच्छा निर्मित ‘लग्नाची बेडी’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. ‘लग्नाची बेडी’, ‘तो मी नव्हेच’, ‘मोरूची मावशी’, ‘कवडी चुंबक’ यासारखी नाटके आजही प्रेक्षकांची गर्दी खेचतात, याचा अभिमान वाटतो.’
प्रास्ताविकात विजय कोलते म्हणाले, ‘आचार्य प्र. के अत्रे यांच्या जन्माचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने पुरंदर येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. साहित्यसम्राट आचार्य अत्रे आपले महाराष्ट्राचे साहित्य आणि कला वैभव आहे. त्यांच्या कलाकृतींचे नाटकांचे सादरीकरण्यासाठी नाट्यमहोत्सव आयोजित केला आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.’
उद्घाटन सोहळ्यानंतर लग्नाची बेडी या नाटकाचा प्रयोग झाला. माजी नगरसेवक अभिमन्यू दहितुले यांनी आभार मानले.