आगीत तीन दुकाने जळून खाक

0
193

पिंपरी, दि.२२ (पीसीबी) : कोयते वस्ती पुनावळे येथे लागलेल्या आगीत तीन दुकाने जाळून खाक झाली. यात तीन दुकानांचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी चार वाजता घडली.

देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर कोयते वस्ती येथे चार वाजता रहमान खान यांच्या स्टार गादी कारखान्यात आग लागली. गाद्यांनी पेट घेतल्याने आग वाढली आणि ही आग शेजारी असलेल्या वैन सिंग यांच्या शिवशक्ती फर्निचर अँड हार्डवेअर या दुकानात पसरली. सिंग यांच्या दुकानात देखील आग वाढल्याने शेजारी असलेल्या अमोल मोरे यांच्या राजनंदिनी ऑटो स्पेअर पार्ट या दुकानात आग लागली.

अग्निशमन विभागाला सव्वाचार वाजता माहिती मिळाली. त्यानुसार रहाटणी, प्राधिकरण आणि एमआयडीसीचे तीन आणि पीएमआरडीएचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एका तासात जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. गादी कारखान्याचे सुमारे एक लाख रुपयांचे, फर्निचर अँड हार्डवेअर दुकानाचे सुमारे आठ लाखांचे तर ऑटो स्पेअर पार्ट दुकानाचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.