भंडारा, दि. ४ (पीसीबी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीवर बोलताना बावनकुळे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. 2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं. भंडारा जिल्ह्यातील लाखनी गावात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
भंडाऱ्यात काय झालं?
काल रात्री भंडाऱ्यातील लाखनी इथं भाजपकडून दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधित केलं. यावेळी 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोण शपथ घेणार? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी समोर बसलेल्या कार्यकर्त्यांना विचारला. तेव्हा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच नावं घेतलं. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
भाजपचे संकल्प काय?
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत थेट देवेंद्र फडणवीस यांनाचं उतरवण्याचा संकल्प बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला. या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तीन संकल्प दिले. त्यात मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. त्यासाठी महाराष्ट्रातून 45 खासदार निवडून पाठवायचे. भंडाऱ्यातील खासदार हा सर्वाधिक मतांनी निवडून पाठवायचा आहे. दुसरा संकल्प वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावायची. आपले उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आणायचे, असं बावनकुळे म्हणाले.
जेव्हा-जेव्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा येतो. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती निवडणूक लढणार आहे, असं भाजपकडून सांगण्यात येतं. 2024 ला कोण मुख्यमंत्री होणार, असा सवाल केल्यास आता इतकंच सांगतो की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुकांना सामोरं जाणार आहोत, असं बावनकुळे यांनीही याआधी म्हटलं आहे. पण काल त्यांनी भंडाऱ्या केलेल्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.