पुणे दि. १९ (पीसीबी) – आगामी काळात स्वयंसेवक शाखा विस्तारासाठी कार्यरत राहणार असून देशभरात एक लाख शाखांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील. तसेच स्व-आधारित व्यवस्था, पर्यावरण, सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन आणि नागरी कर्तव्य या ‘पंच परिवर्तना’च्या सूत्रांवर आधारित काम स्वयंसेवक आगामी वर्षात करतील, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा दि.१५ ते १७ मार्च २०२४ दरम्यान नागपूर येथे झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या महत्त्वपूर्ण प्रतिनिधी सभेमध्ये देशभरातून ३२ संघटनांचे १४६५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. या सभेच्या निमित्ताने पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक प्रा. सुरेश (नाना) जाधव बोलत होते. याप्रसंगी रा.स्व. संघाची प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील कार्याची सद्यस्थितीची माहिती त्यांनी दिली.यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री, पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आदि उपस्थित होते.
सामाजिक समरसता हा संघाच्या रणनीतीचा भाग नसून, निष्ठेचा विषय आहे. सामाजिक परिवर्तन सज्जनशक्तीच्या एकत्रीकरणातून आणि सामूहिक प्रयत्नातून होईल. संपूर्ण समाजाला जोडून सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने जाण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संकल्प आहे.शंभर टक्के मतदान,समरसता ही जीवनशैली बनावी आदि विविध मुद्द्यांवर स्वयंसेवक लक्ष केंद्रित करून कार्यरत राहतील,असे ते म्हणाले.
श्रीराम अभियानात प्रांतात ६५ लक्ष गृह संपर्क
प्रा. जाधव पुढे म्हणाले की, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने श्रीराममंदिरातून अभिमंत्रित होऊन आलेल्या अक्षतांच्या वितरण अभियानात समाजातील सर्वच घटकांचा सक्रिय सहभाग मिळाला. लक्षावधी रामभक्तांनी सर्व शहरे तसेच गावांमधील कोट्यवधी नागरिकांशी संपर्क साधला. देशभरातून ४७२७ नगरातील ५ लाख ७८ हजार ७७८ गावात संपर्क झाला.त्यातून १९ कोटी ३८ लाख ४९ हजार ७१ गृह संपर्क झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर आणि नाशिक अशा सात शासकीय जिल्ह्यात ८ हजार ४३४ गावात एकूण ६४ लाख ७२ हजार ९७६ गृह संपर्क झाले. त्यात २ लाख ४१ हजार ५३ कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. पुणे महानगरात १३ लाख कुटुंबांशी संपर्क करण्यात आला.
ते पुढे म्हणाले की, देशभरात श्रीराम अक्षता वितरण अभियानाच्या निमित्ताने ९ लाख ८५ हजार ६२५ उपक्रम झाले. त्यातून २७ कोटी ८१ लाख ५४ हजार ६६५ नागरिकांशी संपर्क झाला आहे. याशिवाय समाज बांधवांकडून अधिक पटीने विविध उपक्रम झाले. त्यातून कोट्यवधी नागरिकांचा सहभाग दिसून आला.
तसेच यावर्षी ३१ मे २०२४ पासून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती वर्ष सुरु होत आहे. त्यांचे शौर्य, पराक्रम आणि महानता यांना वंदन करत विविध उपक्रमांचे आयोजन रा.स्व. संघाच्या वतीने करण्यात येणार आहे,अशीही माहिती त्यांनी दिली.
याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ( हिंदू साम्राज्य दिनानिमित्त ) विविध उपक्रम आणि कार्यक्रम घेण्यात आले असून आगामी काळात सुद्धा उपक्रमांचे आयोजन सुरु आहे, असेही ते म्हणाले.
प्रांत कार्यवाह डॉ. दबडघाव यांनी यावेळी सांगितले की, देशभरात एकूण ४५ हजार ६०० स्थानी ७३ हजार ११७ शाखा भरत असून २७ हजार ७१७ साप्ताहिक मिलन होतात. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकूण २५९ स्थानी ६५० शाखा आहेत. त्यात १४७ विद्यार्थी शाखा तर २३९ व्यवसायी शाखा आहेत. एकूण ४४६ स्थानी साप्ताहिक मिलन होतात.प.म.प्रांतात एकूण १ हजार ६६९ सेवावस्त्या असून १४० सेवावस्तीत शाखा भरते तर ४२५ शाखांद्वारे सेवाकार्य चालतात.
संघ शिक्षा वर्ग
गेल्या वर्षी देशभरात एकूण १हजार ३६४ संघ शिक्षा वर्ग झाले. त्यात एकूण ३१ हजार ७० शाखांचा सहभाग होता. त्यातून १ लाख ६ हजार ८८३ जणांनी प्रशिक्षण घेतले. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकूण ३० संघ शिक्षा वर्ग घेण्यात आले त्यात ३हजार ४४५ जणांनी प्रशिक्षण घेतले.त्यातील २९ वर्ग प्राथमिक झाले त्यात ३ हजार ११६ तर एका प्रथम वर्गात ३२९ जणांनी प्रशिक्षण घेतले.
सेवाकार्य
देशभरात एकूण १ लाख २२ हजार ९४२ सेवाकार्य सुरु आहेत. त्यातील ५२ हजार ५६२ नियमित सेवाकार्य आहेत. देशात स्थानिक गरजेनुसार विविध ठिकाणी ७० हजार ३८० सेवाकार्य दोन वर्षापासून सुरु आहेत. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात २हजार ३६६ सेवाकार्य सुरु असून त्यातील १हजार २८१ नियमित सेवाकार्य सुरु आहेत.
महिला समन्वय
राष्ट्र निर्माणाच्या कार्यात महिलांचाही मोलाचा सहभाग आहे. भारतीय विचारातून राष्ट्र निर्माण आणि समाज परिवर्तन घडविणे यासाठी देशभरात विविध संस्था, संघटनांमार्फत अनेकविध क्षेत्रात विविध पद्धतीने काम सुरू आहे. या विविध क्षेत्रातील कार्यात महिलांचा सहभाग दिसून येतो. याच अनेकविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांमधील काही प्रमुख महिलांनी महिला विषयक विचार करण्यासाठी एकत्र येऊन विचार मंथन करायला सुरवात केली. त्याद्वारे महिला समन्वय सुरु आहे. महिला विषयक भारतीय चिंतन,महिलांचा देशकार्यात सहभाग या विविध विषयांवर विचार मंथन व्हावे या उद्देशाने देशभरात विभाग/जिल्हा स्तरावर महिला संमेलनांचे आयोजन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकूण बारा संमेलने झाली असून त्यात १६ हजार महिलांनी सहभाग घेतला. संघटित शक्तीतून २५ हून अधिक संघटना-संस्थांचा प्रत्यक्ष सहभाग या संमेलनातून दिसून आला,असेही ते म्हणाले.
माध्यम संवाद परिषद
माध्यम क्षेत्रातील विविध विषयांना अनुसरून व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र घेऊन माध्यमकर्मींशी संवाद-संपर्क व्हावा या उद्देशाने पश्चिम महाराष्ट्र प्रांतात एकूण १५ ठिकाणी माध्यम संवाद परिषदा घेण्यात आल्या. त्यात एकूण एक हजार २१३ माध्यमकर्मी सहभागी झाले होते.
श्रद्धांजली
प्रतिनिधी सभेत गेल्या वर्षात निधन झालेल्या पू. विद्यासागरजी महाराज, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, पद्मश्री डॉ. प्रभाकर मांडे, सरदार चिरंजीत सिंह, पद्मनाभ आचार्य, पद्मश्री अमीन सयानी, ,गायिका डॉ.प्रभा अत्रे, वरिष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर आदि देशभरातील ६७ जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली