नावनोंदणीसाठी कागद पत्रांची पूर्तता करण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन
दि.२६(पीसीबी)पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत महिला व बालकल्याण योजना अंतर्गत मौजे आकुडी येथील खाद्यपदार्थ केंद्रातील गाळे महिला बचत गटांना भाडेकराराने देण्यासाठी ई-लिलावाचे आयोजन करण्यात आले आहे. या ई लिलावसाठी शेवटचे दोन दिवस राहिल्याने महिला बचत गटांनी २८ सप्टेंबर पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आकुर्डी येथे एकूण 49 गाळे ई- लिलावासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यात दिव्यांग महिला बचत गटांसाठी २, तृतीयपंथी गटासाठी १, कोविड योद्धा महिला बचत गटासाठी १, आदिवासी महिला बचत गटासाठी २, DAY-NULM अंतर्गत ३, तर पीसीएमसी सक्षम अंतर्गत नोंदणीकृत महिला बचत गटांसाठी ४० गाळ्यांचे आरक्षण करण्यात आले आहे.
ई-लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुक बचत गटांनी १०,००० रुपये सहभाग शुल्क व ५०० रुपये न परताव्या नोंदणी शुल्कासह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज भरताना संबंधित बचत गटाची नोंदणी प्रमाणपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, शॉप अॅक्ट लायसन्स व आवश्यक परवाने सादर करणे बंधनकारक आहे.
गाळे व्यवसायासाठी प्रथम तीन वर्षांसाठी देण्यात येणार असून कामकाज समाधानकारक असल्यास पुढील दोन वर्षांसाठी मुदतवाढ मिळणार आहे. भाडे व देखभाल शुल्क गटानेच भरायचे असून वेळेत भरणा न झाल्यास दंड आकारला जाणार आहे. गाळ्यांचा वापर केवळ नोंदणीकृत बचत गटांनाच करता येणार असून पोटभाड्याने देणे किंवा बेकायदेशीर कामकाज झाल्यास गाळा जप्त करण्यात येईल, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
इच्छुक २२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत गाळ्यांची पाहणी करू शकतात. अधिक माहितीसाठी समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फोन : ०२०-६७३३१५६६) किंवा रिलायन्स ऑक्शनियर्स (मोबाईल : ९८२२०८२२१९) यांच्याशी संपर्क साधावा, किंवा असे आवाहन समाज विकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिलांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी समाज विकास विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असते. या अंतर्गत आकुर्डी येथे नव्याने उभारलेल्या खाद्यपदार्थ गाळ्यांच्या ई- लिलावात महिलांनी नावनोंदणी करावी.
प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त , पिंपरी चिंचवड महानगरपालिका
समाज विकास विभागाच्या वतीने आकुर्डी येथे उभारण्यात आलेल्या गाळ्यांच्या ई लिलावासाठी महिला बचत गटांनी नाव नोदणी करावी आहे. शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिल्याने लवकरात लवकर कागद पत्रांची पूर्तता करावी.
ममता शिंदे, उप आयुक्त , समाज विकास विभाग , पिंपरी चिंचवड महानगरपालिका