आकुर्डी येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांसोबत आयुक्तांनी साधला संवाद

0
312

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडत आहेत. सर्वत्र स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेत ‍टिकण्यासाठी कौशल्ययुक्त ज्ञानाची गरज भासू लागली असून विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारिक ज्ञानावर भर देणे आवश्यक आहे, असे मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये “विद्यार्थ्यांशी संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना आयुक्त बोलत होते.

यावेळी, विशेष अधिकारी किरण गायकवाड, शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वरणेकर, सचिव ज्ञानेश्वर काळभोर, प्राचार्या सरबजीत कौर महल, परीक्षित कुंभार यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थी जीवन हसत खेळत आणि तणावमुक्त जगा,मोठया स्पर्धांमध्ये सहभाग घ्या.
कठोर मेहनत, प्रामाणिकपणा आणि निरंतर प्रयत्न या त्रिसूत्रीतून यशप्राप्ती होत असते, विद्यार्थ्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढवून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला हवा. चांगले मित्र
बनवून अभ्यासाची प्रक्रीया समजून घेत निरंतर असू द्या, असा सल्लाही देखील आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच, विद्यार्थी दशेपासून ते आजपर्यंतचा व्यक्तीगत अनुभव सुध्दा त्यांनी कथन केला.

कार्यक्रमात विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्कूलच्या प्राचार्या सरबजीत कौर महल यांनी स्कूलमध्ये सूरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थी व विद्यार्थीनींनी नृत्य सादरीकरण आणि गीत गायनाने सर्वांचे लक्ष वेधले.

यादरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. विद्यार्थी जीवनात घ्यावयाची काळजी, तणावमुक्त अभ्यास, परिक्षांना सामोरे जातांना करावयाचे नियोजन, चांद्रयान -3, शहराचा विकास आणि नियोजन, वाहतुक, शिक्षणाच्या संधी, करियर निवडताना घ्यावयाची काळजी, महापालिका प्रशासनाद्वारे सुरु असलेले कार्य, स्वच्छता अभियान, शहराची सुरक्षा, स्पर्धा परिक्षा अभ्यास, आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आयुक्त सिंह यांनी उत्तरे दिली.