आकुर्डी अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन तत्काळ सुरू करा – आमदार लक्ष्मण जगताप

0
369

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन गेल्या दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. त्यामुळे सातबारा, फेरफार नकला मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रचंड गौरसोय होत आहे. या नागरिकांना पुण्यात हेलपाटे मारावे लागत आहेत. नागरिकांची ही गैरसोय टाळण्यासाठी आकुर्डी अप्पर तहसील कार्यालयातील सातबारा फेरफार मशीन तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड शहर व आसपासच्या ३० महसुली गावांचे १९३० ते २०१० या कालावधीतील स्कॅनिंग केलेले सातबारा आणि फेरफार उतारे यांच्या सत्यप्रती देण्यासाठी आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयात क्युऑक्स मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनद्वारे शेतकऱ्यांना सातबारा व फेरफार नकला दिल्या जात होत्या. परंतु, हे किऑक्स मशीन गेल्या दोन वर्षांपासून बंद स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिक नक्कल मिळवण्यासाठी अभिलेख कक्षात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करत आहेत. हे अर्ज निकाली काढण्यासाठी अभिलेखाचा पारंपारिक पद्धतीने शोध घेणे, फी आकारणी करणे, नागरिकांच्या तक्रारीचे निरसन करणे इत्यादी कामांना मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. नागरिकांना कोर्ट कामासाठी, अपील व दावे दाखल करण्यासाठी सातबारा, फेरफार व नक्कल प्रतीची आवश्यकता भासते.

परंतु, आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयातील किऑक्स मशीन बंद असल्यामुळे सातबारा, फेरफार व नक्कल प्रत मिळवण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे. मशीन बंद असल्यामुळे येथील शेतकरी व नागरिकांना फेरफार काढण्यासाठी १५ ते २० किलोमीटर प्रवास करून पुण्यातील खडकमाळ येथील तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. या तहसील कार्यालयात एका नागरिकाला दोन टोकन दिले जाते. त्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहावे लागते. एवढा वेळ उभे राहूनही फेरफार मिळत नसल्याने नागरिकांना खासगी एजंट गाठून नाईलाजास्तव त्याच्याकडून काम करून घ्यावे लागत आहे. तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे या एजंटसोबत संगनमत असते. परिणामी नागरिकांचा वेळ वाया जात असून, त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.

हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर आकुर्डी येथील अप्पर तहसील कार्यालयातील किऑक्स मशीन जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आल्याची नागरिकांची शंका आहे. हे मशीन बंद असल्याबाबत अनेकांनी अनेकदा लेखी तक्रारी करूनही त्याची जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन वर्षे झाली दखल घेतलेली नाही. त्यामुळे मशील जाणूनबूजून बंद ठेवल्याची शंका आणखी बळावत आहे. ही शंका दूर व्हावी आणि पिंपरी-चिंचवडमधील शेतकरी व नागरिकांची गैरसोय टाळावी यासाठी आकुर्डी अप्पर तहसील कार्यालयातील किऑक्स मशीन विनाविलंब तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.”