मित्रांनो, एक काळ होता, जेव्हा आई-वडिल म्हणजे घराचे केंद्रबिंदू असायचे. त्यांचं बोलणं म्हणजे दिशा, त्यांचा आशीर्वाद म्हणजे शक्ती मानली जायची. मुलं त्यांच्या स्वप्नांनाच आपली ओळख मानायची. पण आता काळ जणू काही उलटा फिरलाय ! पालकांना आपल्या मुलांच्या टाइमटेबलमध्ये जागा शोधावी लागते. त्यांच्यासाठी फोनवर “नंतर बोलू” हे शब्द जास्त ऐकायला मिळतात, पण दोन मिनिटांचा मनापासूनचा संवाद मात्र थोडा दुरापास्त झालाय.
समाजशास्त्र आणि मानसशास्त्र सांगतात की प्रत्येक पिढी स्वतःच्या गरजा आणि स्वप्नांसाठी वेगानं जगायला लागली की ‘Emotional Displacement’ नावाचा एक अदृश्य दुरावा निर्माण होतो. म्हणजे लोक एकाच छताखाली राहतात, पण भावनांनी एकत्र नसतात. मुलांना वाटतं की, “आपल्या जबाबदाऱ्या आपण निभावतोय.” पण त्यांच्या लक्षात येत नाही की आईवडिलांची सर्वात मोठी गरज म्हणजे ‘सोबत’ असते, पण तीच सोबत आज हरवत चालली आहे!
आज मुलं म्हणतात, “आम्हाला आमची स्पेस हवीय.” पण त्या स्पेसच्या शोधात ती आईच्या मांडीचा आधार आणि वडिलांच्या हाताची ऊब विसरत चालली आहेत. मानसशास्त्र सांगतं, वयोमान वाढत गेलं की माणसाची Emotional Dependency वाढते. त्यांना पैसा नको असतो, त्यांना त्यांचं कोणीतरी ऐकावं असं वाटतं. त्यांच्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया, त्यांच्या आठवणींवर हसू, आणि त्यांच्या दुःखावर फक्त थोडं लक्ष हवं असतं. … आणि एवढ्यातच त्यांचं समाधान दडलेलं असतं.
संत तुकारामांनी म्हटलं आहे, “आई-वडिलांसी करावे नम्र भावे सेव, त्यांची सेवा करावी, तोचि परम देव.”
ही वाक्यं म्हणजे नात्यांचा गाभा आहेत. कारण माणूस देव शोधायला मंदिरात जातो, पण त्या देवाचं रूप आईवडिलांच्या डोळ्यांतच चमकत असतं हे त्याच्या लक्षात येत नाही. मुलं म्हणतात, “आम्ही त्यांच्यासाठी सगळं केलं…” पण ‘सगळं’ म्हणजे काय? पैसा? औषधं? घरातला एक कोपरा? मग हे सगळं असूनही त्यांच्या चेहऱ्यावर एकटेपणाचं सावट का असतं? कारण तुम्ही कदाचित त्यांच्यावर प्रेम करत असाल…पण त्यांना त्यासोबतच तुमची उपस्थितीही हवी असते जी आपण विचारात घेत नाही.
मानसशास्त्र सांगतं, “Loneliness in old age doesn’t come from being alone, it comes from being forgotten by the ones you lived for.” ही ओळ म्हणजे आजच्या पिढीचा आरसा आहे. आईवडिल कधीही स्वत:साठी जगत नाहीत. ते आयुष्यभर स्वत:ला विसरुन आपल्या मुलांसाठी जगतात, नव्हे झिजतात ! आणि मुलं मात्र पंख फुटले की करिअर, सोशल मिडीया, आणि स्वप्नांच्या गडबडीत त्यांनाच हरवून बसतात.
संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिकेत लिहिलंय, “माऊली हि चि अनंता, तिचे प्रेमे ब्रह्म जरी बांधे.” माऊलीचं प्रेम म्हणजे ब्रह्माला बांधून ठेवणारं बंधन, आणि आपण मात्र त्या प्रेमापासून स्वतःलाच मुक्त समजतोय… आणि हेच आपल्या पिढीचं खरं दु:खं आहे.
आईवडिलांचा सहवास हा भार नसतो, तो अनुभवांचा खजिना असतो. त्यांचं बोलणं म्हणजे प्रेरणादायी इतिहास, त्यांचा शांत चेहरा म्हणजे आशीर्वाद. पण आपण मात्र आधुनिक झालो, व्यस्त झालो आणि स्वतःपुरते झालो. आता घरात फर्निचर, गॅझेट्स, सुविधा हे सगळं आहे, फक्त जिव्हाळा नाही, आईवडिलांशी संवाद नाही!
एकदा वडील शांत बसले होते, मुलाने विचारलं, “काय झालं?”
ते म्हणाले, “काही नाही रे… फक्त घरात आवाज थोडा कमी वाटतो.”
मित्रांनो, हा ‘आवाज’ म्हणजे हास्य, बोलणं, थोडं चिडणं…तोच तर घराचा प्राणवायू असतो!
जसं संत एकनाथ म्हणतात, “आपुला दोष शोधावा, दुसरा न पाहावा.” त्यानुसार आपण सगळ्यांनी थांबून एक क्षण स्वतःकडे पाहायला हवं. आपण आईवडिलांशी केव्हा शेवटचं निर्लेप बोललो होतो? केव्हा शेवटचं त्यांच्या डोळ्यांत पाहून “तुमच्यामुळे मी आहे” असं म्हटलं होतं?
पालकांची सेवा करणं म्हणजे दान नाही. ती आपल्या अस्तित्वाची परतफेड आहे. त्यांचं प्रेम, त्यांचे त्याग, आणि त्यांचा मूक आशीर्वाद… हे नातं देवासारखं आहे, ज्याचं अस्तित्व विसरलं की जीवनच निर्जीव होतं…
मित्रहो, हा लेख म्हणजे काही कुणावर आरोप नाही. या लेखातील विचार म्हणजे आजच्या पिढीबाबतीतलं एक जनरल स्टेटमेंट आहे. आपल्यातील बरेच जण आईवडीलांसोबत राहत असतील, त्यांची सेवाही करत असतील. मी सुद्धा माझ्या आईवडीलांसोबत राहतो.. त्यांच्यासाठी सारेकाही करतो… मात्र जे करत नाहीत, त्यांच्यासाठी हा लेख आहे…
काय वाटतं तुम्हाला?
कमेंटमध्ये नक्की सांगा.
            
		














































