आईसक्रीम दुकानदाराकडे मागितली खंडणी

0
366

तळेगाव दाभाडे, दि. २९ (पीसीबी) – आईसक्रीम दुकानदाराकडे दुकानात येऊन चार जणांनी खंडणी मागितली. खंडणी देण्यास नकार दिल्याने आरोपींनी दुकानातील कामगारांना मारहाण करून जबरदस्तीने पैसे काढून नेले. ही घटना बुधवारी (दि. 27) रात्री शिवाजी चौक तळेगाव दाभाडे येथे घडली.

हरीश पप्पू शर्मा (वय 24, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्ष प्रमोद साठे (वय 19, रा. वराळे, ता. मावळ), कुमार सुरेश मोहिते (वय 19, रा. तळेगाव दाभाडे), अनिल सुरेश मोहिते (वय 21, रा. समता कॉलनी, तळेगाव दाभाडे), जय उर्फ कीटक प्रवीण भालेराव (वय 18, रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकात फिर्यादी यांचे आईसक्रीमचे दुकान आहे. बुधवारी रात्री अकरा वाजता आरोपी फिर्यादी यांच्या दुकानात आले. आरोपींनी फिर्यादीकडे हप्त्याची मागणी केली. हप्ता न दिल्याने आरोपींनी दुकानातील वस्तूंची तोडफोड करून कामगारांना मारहाण केली. फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.