आंबेडकर-फुले जयंती उत्सवाचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नको

0
204

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्यमानाने साजरी करण्यात येणार्‍या महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमात महानगरपालिकेने प्रमुख अतिथी म्हणून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित केले आहे. या प्रकाराने संपूर्ण आंबेडकरी समूहात संताप व्यक्त केला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम होणार असेल तर आमचा विरोध असेल, असा सूर आहे.

भाजपचे सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी त्यासंदर्भातील एक पत्र, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनायक चोबे यांनी दिले आहे. पिंपरी चिंचवड शहरात महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्या प्रकरणी तीन महिन्यापुर्वीच चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पिंपरी चिंचवड महानगरपालिका चंद्रकांत पाटील यांना आमंत्रित करून खोडसाळ प्रकार करून जयंती उत्सवाला गालबोट लावण्याचा प्रकार केला आहे. त्याचा आम्ही संपूर्ण आंबेडकरी समाज पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने निषेध करीत आहोत, असे काळभोर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणात लक्ष घालून चंद्रकांत पाटील यांना सदर कार्यक्रमात उपस्थित राहण्यास मज्जाव करावा, अन्यथा आम्ही चंद्रकांत पाटील यांचा लोकशाही मार्गाने सनदशीरपणे विरोध करू यांची नोंद घ्यावी, असेही काळभोर यांनी म्हटले आहे. महात्मा जोतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव शांततेत व उत्साहात साजरी करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.