आंदोलनात्मक दहशतवादा’च्या माध्यमांतून राष्ट्राला अधिक हानी पोहोचवणार्‍या पी.एफ्.आय. कारवाई आवश्यक ! – ब्रिगेडिअर हेमंत महाजन

0
281

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) -नागरिकांनी निवडून दिलेल्या सरकारने बनवलेल्या कायद्याला मोठ्या प्रमाणात विरोध करून हिंसाचार केला जात आहे. वर्ष 2014 नंतर दहशतवादाचे स्वरुप बदलत चालले आहे. सध्या ‘एजीटेशनल टेररीझम’च्या (आंदोलनात्मक दहशतवाद) माध्यमातून देशाला धोका निर्माण करण्याचे कार्य ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून (पी.एफ्.आय.) चालू आहे. दहशतवादी हल्ल्यांपेक्षा दंगल घडवणे, लोकांना उग्रवादी बनवणे यांमुळे अधिक हानी होत आहे, हे या लोकांनी ओळखले आहे. त्यामुळे पी.एफ्.आय.ची सखोल चौकशी व्हायला हवी. त्यांच्यावर कठोर कारवाई आवश्यक आहे, असे प्रतिपादन सैन्य दलातील सेवानिवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘पी.एफ्.आय.वर बंदी का आणावी ?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

ब्रिगेडिअर हेमंत महाजन पुढे म्हणाले की, उग्रवादी संघटना किंवा दहशतवादी संघटना यांना काम करण्यासाठी पैसे लागतात. पी.एफ्.आय.ला इस्लामी राष्ट्रांतून फंडिंग झाले आहे. हे फंडिंग बंद व्हायला हवे. तरच या दहशतवादी कारवाया थांबतील. जी इस्लामी राष्ट्रे, तसेच देशातील अन्य संघटना पी.एफ्.आय.ला आर्थिक साहाय्य करत असतील, त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करायला हवी. जोपर्यंत पी.एफ्.आय.कडे येणारे आर्थिक मार्ग बंद होत नाहीत, तोपर्यंत दहशतवादी कारवाया थांबणार नाहीत.

जिनांप्रमाणे पी.एफ्.आय.ला भारताला खंडीत करून इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे ! – प्रवीण दीक्षित

महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले की, वर्ष 1947 मध्ये महंमद जिना याने अखंड भारताची विभागणी करून पाकिस्तान बनवले. त्याच धर्तीवरच ‘पी.एफ्.आय.’चे इस्लामी राष्ट्र बनवण्याचे षड्यंत्र आहे. आखाती देश ‘पी.एफ्.आय.’ला दर महिन्याला कोट्यवधी रुपये पाठवतात, भारतात धर्मद्वेष आणि जातीद्वेष पसरवून अराजकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे केवळ ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालून या कारवाया बंद होणार नाहीत; कारण ही एक विचारधारा आहे. ते वेगळ्या नावाने पुन्हा आतंकवादी कारवाया करत राहतील. यासाठीच केंद्राने ‘बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा’ (UAPA) लागू केला असून याआधारे संघटनेचे नाव पालटून कारवाया करणार्‍या व्यक्तींवर कारवाई केली जात आहे. या कायद्याद्वारे त्वरित कठोर कारवाई झाल्यासच आतंकवादी पुढे मोठी देशद्रोही कृती करण्यास धजावणार नाही. आतंकवाद्यांवर न्यायपद्धतीने कारवाई होत असते, तरीही ‘मुसलमानांवर अत्याचार केले जात आहेत’, असा आतंकवाद्यांचे समर्थक कांगावा करताना दिसतात. अशा खोट्या अपप्रचाराच्या विरोधात जनजागृती झाली पाहिजे, असेही निवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले.