आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक हर्षद कुलकर्णी यांची महाराष्ट्र जिम्नॅस्टिक संघटनेच्या तांत्रिक समितीत ३ दा निवड

0
3

सांगली येथे दिनांक १ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र जिम्नॅस्टिक हौशी संघटनेची कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत जिम्नॅस्टिकच्या विविध उपप्रकारांसाठी तांत्रिक समित्यांची घोषणा करण्यात आली. ही बैठक संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय शेटे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सचिव श्री. मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या बैठकीत पिंपरी-चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक संघटने तर्फे श्री. हर्षद कुलकर्णी यांची तिसऱ्यांदा एरोबिक जिम्नॅस्टिक या प्रकाराच्या तांत्रिक समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
श्री. कुलकर्णी गेली २५ वर्षांहून अधिक काळ जिम्नॅस्टिक क्षेत्रात कार्यरत असून ते एरोबिक जिम्नॅस्टिक या क्रीडा प्रकारातील आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
याचबरोबर पिंपरी-चिंचवडमधून श्री. शुभम भाले यांची आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक या प्रकारासाठी, तर श्री. कौशल सुनारिया यांची ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक या प्रकाराच्या तांत्रिक समितीसाठी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल पिंपरी-चिंचवड जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचे अध्यक्ष श्री. संजय मंगोडेकर, उपाध्यक्ष सौ. अलका तापकीर, सचिव श्री. संजय शेलार तसेच सहकोषाध्यक्ष श्री. दीपक सुनारिया यांनी सर्व निवड झालेल्या तांत्रिक समिती सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
ही निवड पिंपरी-चिंचवडच्या जिम्नॅस्टिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली असून स्थानिक खेळाडूंसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली असून ही माहिती संघटनेचे सचिव संजय शेलार यांनी दिली.