आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याच्या बहाण्याने लाखोंची फसवणूक

0
204

आकुर्डी, दि. ०९ (पीसीबी) – आकुर्डी येथील डॉ. डी वाय पाटील इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याच्या बहाण्याने लाखो रुपये घेऊन फसवणूक करण्यात आली. तसेच एका व्यक्तीकडून इव्हेंट आयोजित करण्याच्या बहाण्याने दहा लाख रुपये घेत फसवणूक केली. याप्रकरणी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 19 जुलै 2023 ते 7 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आकुर्डी येथे घडला.

डॉ. कुलदीप ओंकारसिंग चरक (वय 62, रा. हडपसर, पुणे) यांनी याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आयरिस ग्लोबल मिडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद हेगडे (रा. सांताक्रूझ इस्ट, मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना डॉ. डी वाय पाटील इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आकुर्डी येथे आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्याचे भासवून त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेतले. त्यातील एक लाख दोन हजार रुपये परत करून उर्वरित तीन लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केली.

तसेच सिम्प्लिफाई सक्सेस फर्मचे सह संस्थापक सिद्धार्थ किशोर गौर यांना देखील आरोपीने डी वाय पाटील युनिव्हर्सिटी येथे टीईडीएक्स इव्हेंट आयोजित करणार असल्याचे भासवून त्यांच्याकडून 10 लाख रुपये घेत इव्हेंट आयोजित न करता त्यांची फसवणूक केली. रावेत पोलीस तपास करीत आहेत.