आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष जय शाह

0
84

नवी दिल्ली, दि. २८ -(पीसीबी) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांच्याबाबत एक मोठी बातमी आली आहे. जय शाह आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष होणार आहेत. ICC चेअरमन पदासाठी अर्ज करणारे एकमेव अर्जदार जय शाह होते. यासह जय शाह यांची अध्यक्षपदासाठी बिनविरोध निवड झाली. येत्या १ डिंसेबर २०२४ पासून जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. २७ ऑगस्ट ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. ३५ वर्षीय जय शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.

आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यांनी सलग दुसऱ्यांदा हे पद भूषवले आहे. पण अलीकडेच त्याने तिसऱ्या टर्मच्या शर्यतीत नसल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत, खेळाची जागतिक प्रशासकीय संस्था असलेल्या आयसीसीमध्ये जय शाह अध्यक्षपदासाठी दावा खूप मजबूत मानला जात होता. जय शाह यांनी बीसीसीआयचे सचिव म्हणून भारतीय क्रिकेटला वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवले. आता त्यांची आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्याचा फायदा भारतीय क्रिकेटलाही नक्कीच होईल, असे सुनील गावसकर यांनीही त्यांच्या क्रीडा स्तंभलेखात म्हटले होते.

ICC नुसार, जय शाह हे एकमेव उमेदवार होते ज्यांनी या पदासाठी अर्ज दाखल केला होता आणि पुढील अध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. शाह हे आयसीसी बोर्डातील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. ते सध्या आयसीसीच्या शक्तिशाली वित्त आणि व्यावसायिक व्यवहार उप-समितीचे प्रमुख आहेत.