अॅक्सिसच्या पोलमधून ठाकरे-पवारांची जादू अजिबात चालत नसल्याचे समोर

0
47

मुंबई, दि. २२ (पीसीबी) : लोकसभेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर एकीची वज्रमूठ करून विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या महाविकास आघाडीला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये काँटे की टक्कर होणार तसेच कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे अनेक माध्यम संस्थाचे म्हणणे होते. परंतु अॅक्सिस माय इंडियाने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांनुसार महायुती १८० जागा जिंकून बहुमताने सत्तेत येईल. तर पक्षफुटीनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना प्रचंड सहानुभूती मिळाल्याचे बोलले जात असताना मात्र अॅक्सिसच्या पोलमधून ठाकरे-पवारांची जादू अजिबात चालणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभा निवडणूक काळात महाराष्ट्र पिंजून काढला. विदर्भ-मराठवाडा-उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात त्यांनी झंझावाती दौरे केले. त्यांच्या सभांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पक्षफूट हे त्यामागील मोठे कारण मानले गेले. तेच उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही झाले. तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षही फुटला. एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे ठाकरेंना देखील पक्षफुटीची प्रचंड सहानुभूती मिळाली. अगदी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीचा सुपडासाफ होऊन आघाडीला जोरदार यश मिळाले. हाच टेम्पो विधानसभेतही कायम राहिल, असे आघाडीला वाटत होते. परंतु अॅक्सिसच्या पोलमध्ये राज्यात आघाडीचा सुपडासाफ होईल, असे सांगितले जाते.

पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार यांचा बालेकिल्ला. मात्र त्याच बालेकिल्ल्यात एकूण ५८ जागांपैकी महायुती ३६ जागा जिंकेल तर महाविकास आघाडीला २१ जागांवर यश मिळेल, असे अॅक्सिसच्या पोलचा अंदाज आहे. शेतकऱ्यांची नाराजी, ऊस आणि दुधाचा दर असे कोणतेही मुद्दे सरकारविरोधात जाणार नाही, असे अॅक्सिसच्या पोलमधून समोर आले आहे.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनाही अजिबात सहानुभूती मिळणार नाही, असे अॅक्सिसच्या पोलचा अंदाज आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केवळ २६-३२ जागा मिळू शकतात, असे सांगण्यात आले आहे.